Friday, March 13, 2026 07:58:52 AM

Manipur Violence: मणिपूर पुन्हा पेटलं! उखरुलमध्ये अतिरेक्यांकडून घरांची जाळपोळ; दगडफेक आणि गोळीबारानंतर संचारबंदी लागू

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लिटान सारेइखोंग येथे कुकी अतिरेक्यांनी तंगखुल नगा समुदायाच्या घरांना लक्ष्य केले. प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या बाजूने कुकी समुदायाच्या घरांनाही लक्ष्य करण्यात आले.

manipur violence मणिपूर पुन्हा पेटलं उखरुलमध्ये अतिरेक्यांकडून घरांची जाळपोळ दगडफेक आणि गोळीबारानंतर संचारबंदी लागू

Manipur tensions: मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसक वणवा पेटला असून अतिरेक्यांनी अनेक घरांना आगी लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी, 8 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी लिटान परिसरात दोन आदिवासी गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले. तंगखुल नगा समुदायाच्या एका सदस्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दगडफेक सुरू झाली आणि रात्री उशिरापर्यंत या वादाने हिंसक वळण घेतले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाने उखरुलमध्ये तत्काळ कलम 144 (Section 144) लागू केले असून संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

मध्यरात्रीची जाळपोळ आणि अत्याधुनिक शस्त्रांचा वापर
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लिटान सारेइखोंग येथे कुकी अतिरेक्यांनी तंगखुल नगा समुदायाच्या घरांना लक्ष्य केले. या हल्ल्यात अनेक घरे आणि वाहने जाळून खाक करण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये अतिरेकी अत्याधुनिक स्वयंचलित शस्त्रांनी हवेत गोळीबार करताना आणि घरांना आगी लावताना दिसत आहेत. प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या बाजूने कुकी समुदायाच्या घरांनाही लक्ष्य करण्यात आल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. नगा ही मणिपूरमधील सर्वात मोठी आदिवासी जमात असल्याने या वादाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा - Abdul Rahman killed: राम मंदिर उडवण्याचा कट रचणाऱ्या अब्दुल रहमानला तुरुंगातच संपवलं; जाणून घ्या घटनाक्रम

किरकोळ वादातून संघर्षाची ठिणगी
या हिंसाचाराची सुरुवात शनिवारी रात्री झाली होती. लिटान गावात तंगखुल नगा समुदायाच्या एका तरुणाला 7 ते 8 जणांनी मारहाण केली होती. सुरुवातीला हा वाद स्थानिक पातळीवर आणि पारंपरिक पद्धतीने सोडवण्याचे ठरले होते, परंतु रविवारी नियोजित बैठक होऊ शकली नाही. त्याऐवजी सिकिबुंग गावातील एका जमावाने थेट गावप्रमुखाच्या घरावर हल्ला केला आणि पोलीस ठाण्याजवळून जाताना 7 राऊंड गोळीबार केला. यामुळे शांत असलेल्या उखरुल जिल्ह्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली.

सुरक्षा दलांचा कडा पहारा आणि संचारबंदी
जिल्हा दंडाधिकारी आशिष दास यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रविवारी संध्याकाळी 7:00 वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. महादेव, लंबुई आणि शांगकाई यांसारख्या संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. सध्या उखरुलमध्ये कडेकोट बंदोबस्त असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी सर्व समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा - Accident News: श्रीमंतीचा उन्माद! प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या लेकाचा रस्त्यावर कहर; भरधाव लॅम्बोर्गिनीने 6 जणांना चिरडलं


सम्बन्धित सामग्री