Prasad Oak Reacts on Salman Khan Attended RSS Programme: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा सोहळा सध्या मुंबईत मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित 'नवे क्षितिज' व्याख्यानमालेत राजकीय नेत्यांसोबतच मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांची हजेरी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. विशेषतः बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खानच्या उपस्थितीने अनेकाजण आश्चर्यात पडले आणि चर्चेला उधाण आले.
नेहरू सेंटरमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी
आरएसएस (RSS) च्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या 'नवे क्षितिज' व्याख्यानमालेचा उद्देश संघाच्या शताब्दी प्रवासाचा उलगडा करणे हा होता. या सोहळ्याला सलमान खान, हेमा मालिनी, अक्षय कुमार आणि जॅकी श्रॉफ यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. तर मराठी सिनेसृष्टीतील महेश मांजरेकर, प्रसाद ओक, सुनील बर्वे आणि भाऊ कदम यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांचीही उपस्थिती होती.
प्रसाद ओक आणि सुनील बर्वे यांची रोखठोक प्रतिक्रिया
कार्यक्रमात सलमान खानला पाहून अभिनेता प्रसाद ओक चकित झाला. तो म्हणाला, "सलमान खानची उपस्थिती माझ्यासाठी खरोखरच 'शॉकिंग' होती. पण त्याचे अशा प्रकारे संघाच्या कार्यक्रमात येणे, हे त्याने संघाच्या कार्याप्रती दाखवलेला सन्मान आहे असे मला वाटते." दुसरीकडे, सुनील बर्वे यांनीही याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले. "सलमान एक चांगला माणूस आहे. संघाच्या विचारांबाबत त्याच्या मनात काही प्रश्न असतील, तर त्याची उत्तरे शोधण्यासाठी तो इथे आला असावा. आदर्श विचार ऐकण्यासाठी कोणीही येणे ही चांगलीच गोष्ट आहे आणि त्याचे स्वागतच व्हायला हवे," असे मत सुनील बर्वे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - Sachin Pilgaonkar on Trolling : 'मला ट्रोल करून रात्री शांत झोपू शकत असाल तर...', सततच्या ट्रोलिंगवर सचिन पिळगावकरांनी केलं भाष्य
मोहन भागवत सलमानच्या लोकप्रियतेबाबत काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सलमान खानच्या लोकप्रियतेचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, "कॉलेजमधील तरुण मुले सलमान खानच्या फॅशनची नक्कल करतात. त्यांना विचारले की असे का करता? तर त्यांना त्याचे कारण माहीत नसते, फक्त सलमान करतोय म्हणून ते करतात. जर समाजहिताची मूल्ये अशाच प्रकारे 'फॅशन' बनली, तर देशात मोठे सकारात्मक बदल घडतील." दोन दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेत मोहन भागवत यांनी उपस्थितांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली आणि संघाची भूमिका स्पष्ट केली.
'नवे क्षितिज' आणि शताब्दी वर्षाचा संकल्प
या सोहळ्याच्या माध्यमातून संघाने समाजातील सर्व स्तरांतील आणि विचारधारांतील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. 1925 साली स्थापन झालेल्या संघाचा हा शताब्दी प्रवास एका नव्या वळणावर असून, आगामी काळातही विविध शहरांमध्ये अशा व्याख्यानमाला आयोजित केल्या जाणार आहेत. मुंबईतील या कार्यक्रमाला 900 हून अधिक निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. सलमान खान बराच वेळ बसून मोहन भागवत यांचे भाषण शांतपणे ऐकत असल्याचे सर्वांनी पाहिले. सोशल मीडियावर याबाबत देखील मोठी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा - Sayaji Shinde: 'दादांचं स्वप्न पूर्ण व्हावं…' सयाजी शिंदेंनी घेतली सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट ; विलीनीकरणावर नेमकी काय चर्चा झाली?