Marathi Language Insult : भाषेच्या मुद्द्यावरून नाशिक शहरात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. शरणपूर रोडवरील एका नामांकित खासगी कोचिंग क्लासमध्ये मराठी विद्यार्थ्यांचा अपमान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठीत बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना "गावठी आणि मॅनर्सलेस" संबोधणाऱ्या शिक्षकाची मनसे कार्यकर्त्यांनी चांगलीच हजेरी घेतली.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित खासगी शिकवणी वर्गात बहुतांश शिक्षक हे राज्याबाहेरील आहेत. या क्लासमध्ये विद्यार्थ्यांवर हिंदीत बोलण्याची सक्ती केली जात होती. अनेक विद्यार्थ्यांनी लाखो रुपये फी भरली असल्याने भाषेची अडचण असूनही ते शांत होते. मात्र, एका तासादरम्यान काही विद्यार्थी आपापसात मराठीत बोलत असताना, एका शिक्षकाने त्यांना अडवले. 'मराठी भाषा गावठी आहे, इथे फक्त हिंदीच बोलायची,' असे विधान या शिक्षकाने केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
हेही वाचा - Sunetra Pawar Meet PM Modi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची दिल्लीवारी, पंतप्रधान मोदी अन् अमित शाह यांची घेतली भेट; कोणत्या विषयावर झाली चर्चा?
'राजगड'वर दाद अन् क्लासमध्ये न्याय
अपमानित झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट मनसेचे नाशिकमधील मुख्य कार्यालय 'राजगड' गाठले आणि आपली व्यथा मांडली. मराठी भाषेचा अपमान झाल्याचे समजताच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष ललित वाघ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तातडीने संबंधित क्लासमध्ये धडक दिली. यावेळी त्या शिक्षकाला गाठून कार्यकर्त्यांनी त्याला कानशिलात लगावत 'मराठीचा अवमान सहन केला जाणार नाही' असा इशारा दिला.