मुंबई : महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातील गुन्ह्यांबाबत ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा, अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदनाद्वारे केली. राष्ट्रपती मुर्मू यांची विधान परिषदेचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबईतील राजभवन येथे भेट घेतली. यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना महिलांवरील अत्याचार आणि उपाययोजना संदर्भात निवेदन सादर केले.
अल्पवयीन मुली आणि महिलांसोबत गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगारांना अनेकदा फाशीची शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर गुन्हेगार दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे देत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरोपींकडून आलेले दयेचे अर्ज अनेकदा प्रलंबित राहतात आणि त्यामुळे फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करता येत नाही. यासाठी अशा गुन्हेगारांचा दयेचा अर्ज नाकारला जावा, अशी विनंती उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केली. उपसभापती यांनी केलेल्या मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करून निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.