छत्रपती संभाजीनगर : नाव जरांगेंचं, राजकारण उद्धव, पवारांचं असं सुरू असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले. मनोज जरांगेंच्या आडून राशपचे प्रमुख शरद पवार आणि शिउबाठाचे प्रमुख उद्धव हे दोघे राजकारण करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
महाराष्ट्रात नोकऱ्यांसाठी आरक्षणाची आवश्यकताच नाही, या भूमिकेचा राज ठाकरेंनी पुनरुच्चार केला. आरक्षण द्यायचेच असेल तर ते जातीआधारे नाही तर आर्थिक निकषांच्या आधारे द्यावे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.
आरक्षणाबत देशात काय धोरण असावे याचा निर्णय घेण्यासाठी संसद ही समर्थ व्यवस्था आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने शहाबानो प्रकरणात दिलेला निर्णय लोकसभेतून फिरवण्यात आला होता; असे राज ठाकरे म्हणाले. जाती - जातींमध्ये तणाव निर्माण होणे हिताचे नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. काही नेते महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो अशी भाषा वापरतात त्यांना राज ठाकरेंनी जाब विचारला. कायदा - सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत असे राज ठाकरे म्हणाले.