Monday, February 10, 2025 07:40:07 PM

GONDIA CRIME NEWS
प्रेम संबंधातून आईनेच केली चिमुकलीची हत्या

जन्मदात्रीच निघाली वैरी पलखेडा - हेटी येथील घटना

प्रेम संबंधातून आईनेच केली चिमुकलीची हत्या

गोंदिया : जिल्ह्यातील पलखेडा-हेटी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आणि मुलाचे नाते जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ नात्यांपैकी एक मानले जाते, मात्र या नात्याला काळीमा फासण्याची घटना घडली आहे. गोंदिया तालुक्यातील या घटनेत प्रेमसंबंधामुळे जन्मदात्री आईनेच आपल्या २ वर्षीय मुलीची हत्या केली. पोलिसांच्या तपासामुळे ही घटना उघडकीस आली आहे आणि त्यात आई गुणिता चामलाटे आणि तिचा प्रियकर राजपाल मालवीय यांनीच प्रेमसंबंधांमधील अडचण म्हणून २ वर्षीय चिमुकलीची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, या प्रकाराने परिसरातील नागरिक चिंतेत आहेत.


सविस्तर बातमी अशी की, मानसी ताराचंद चामलाटे (वय २ वर्ष) असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. तर मानसी आई गुणिता चामलाटे (वय २९) व तिचा प्रियकर राजपाल मालवीय (वय ३२) रा. देवास जि. उज्जैन (मप्र) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पलखेडा-हेटी येथील ताराचंद चामलाटे याला दोन पत्नी होत्या. त्यापैकी गुणिता चामलाटे ही दुसरी पत्नी होती. गुणिता चामलाटे हिला एक मुलगा, एक मुलगी असे दोन अपत्य आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी ताराचंद चामलाटे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुणिता चामलाटे ही महिला दोन्ही अपत्यांना घेवून रोजगारासाठी नागपूर येथील खापरखेडा येथे गेली होती. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

अचानक २७ डिसेंबर रोजी गुणिता चामलाटे ही ३ वर्षीय चिमुकली मानसी चामलाटे हिचा मृतदेह घेवून अंत्यसंस्कारासाठी पलखेडा/हेटी दाखल झाली. आप्तेष्ठितांच्या उपस्थितीत मानसीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मानसीच्या मृत्यूला घेवून कुटूंबियांकडून संशय व्यक्त करण्यात आला. संशयाच्या आधारावर मोठी आई कलाबाई ताराचंद चामलाटे हिने २७ डिसेंबरच्या रात्री गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली.

 तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी तिरोडा यांच्या समक्ष पलखेडा/हेटी येथील स्मशानभूमीत मातीत पुरलेले मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी करण्यात आली. मृतदेहाचा विसरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. तर दुसरीकडे गोरेगाव पोलिसांनी गुनिता ताराचंद वामलाटे हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर मानसीचा मृत्यू खापरखेडा (जि. नागपूर) पोलिस ठाण्यातंर्गत झाल्याने प्रकरण खापरखेडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. 

पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवून प्रकरणाचा छडा लावला. त्यात प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेल्या ३ वर्षीय चिमुकलीचा तिची आई व प्रियकरानेच काटा काढल्याचे समोर आले. दरम्यान दोन्ही आरोपीना खापरखेडा पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

हे देखील वाचा : चक्क 10 एकर तुरीच्या पिकावर फिरवला शेतकऱ्याने रोटावेटर ? काय आहे कारण ?


सम्बन्धित सामग्री