Wednesday, April 22, 2026 11:38:22 PM

Justice for Daughter in Law : सुनांना न्याय मिळवून देण्यासाठी सासूचं धाडसी पाऊल, विरोधात साक्ष देत नराधम मुलाला धाडलं कोठडीत; न्यायाधीशांनी दिली 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

आपल्या दोन सुनांवर वाईट नजर ठेवणाऱ्या आणि त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी एक आई थेट कोर्टात पोहोचली.

justice for daughter in law  सुनांना न्याय मिळवून देण्यासाठी सासूचं धाडसी पाऊल विरोधात साक्ष देत नराधम मुलाला धाडलं कोठडीत न्यायाधीशांनी दिली 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

Mother testifies against son to save daughter in law in Jodhpur : सासू आणि सून यांच्यातील नाते सहसा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जाते. सासू आणि सून यांचे कधी एकमेकींशी पटू शकणार नाही, अशीच बहुतेकांची धारणा असते. शिवाय, बहुतेक वेळा आई स्वतःच्या मुलाची चूक असेल तरी त्याला क्षमा करण्याच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळते. मात्र जोधपूरमधील एका घटनेने या दोन्ही समजांना पूर्णपणे छेद दिला आहे. आपल्या दोन सुनांवर वाईट नजर ठेवणाऱ्या आणि त्यांच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी एक आई थेट कोर्टात पोहोचली. रक्ताच्या नात्यापेक्षा न्यायाला महत्त्व देत या माऊलीने स्वतःच्या मुलाच्या विरोधात साक्ष दिली. आईच्या या धाडसी भूमिकेमुळे आरोपी मुलाला कठोर शिक्षा सुनावताना न्यायालयानेही तिचे कौतुक केले असून हा निकाल सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे.

काय होते हे धक्कादायक प्रकरण?
जोधपूरमधील पीपाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 2021 मध्ये हे प्रकरण पहिल्यांदा समोर आले. आरोपीने घरातील धाकट्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता, तिने आरडाओरडा केला. आवाजामुळे जागी झालेली आई धावत आली आणि तिला पाहताच मुलगा तिथून पळून गेला. या घटनेनंतर मोठ्या सुनेनेही आपल्यासोबत आरोपीने गैरवर्तन केल्याचा गौप्यस्फोट केला. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने कुटुंब गप्प राहिले, मात्र जेव्हा या विकृत मुलाने पुन्हा लहान सुनेवर हात टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुटुंबीयांचा संयम सुटला आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले.

आईची साक्ष ठरली निर्णायक
या संपूर्ण खटल्यात आरोपीच्या आईची, म्हणजेच दोन्ही सुनांच्या सासूची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. "माझ्या मुलाने केलेले कृत्य माफीच्या पलीकडे आहे, त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्या," असे आवाहन तिने न्यायाधीशांना केले. पोटच्या गोळ्याच्या विरोधात साक्ष देणे कोणत्याही आईसाठी कठीण असते. मात्र, सुनांना न्याय मिळवून देण्यासाठी तिने सत्याची साथ दिली. या खंबीर साक्षीमुळे आरोपीचे गुन्हे सिद्ध झाले आणि न्यायालयाने त्याला विविध कलमांखाली दोषी ठरवत 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 85,000 रुपयांचा दंड ठोठावला.

हेही वाचा - Custodial Death Case: अखेर 'त्या' पिता-पुत्रांना न्याय मिळाला! कोठडीत जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना मिळाली फाशीची शिक्षा

न्यायाधीशांनी वाचल्या 'रामचरितमानस'च्या ओळी
या प्रकरणाचा निकाल देताना जोधपूरच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अत्यंत मार्मिक भाष्य केले. आईने दाखवलेल्या धैर्याचा सन्मान करत न्यायाधीशांनी रामचरितमानस मधील पुढील ओळींचा उल्लेख केला: ‘अनुजवधू भगिनी सुतनारी, कन्या सम एति चारि. एहि को देख कुदृष्टि से, ताहि बधे कछु पाप न होई’. याचा अर्थ असा की, धाकट्या भावाची पत्नी (किंवा घरातील सून) ही मुलगी आणि बहिणीप्रमाणे असते. तिच्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याला शिक्षा देणे हे पाप नसून धर्म आहे.

समाजासाठी एक नवा आदर्श
ही घटना केवळ एका गुन्ह्याची उकल नसून सासू-सून या नात्यातील विश्वासाचे एक नवे उदाहरण आहे. बदनामीच्या भीतीपोटी अनेकदा घरातील गुन्हे दाबले जातात, पण एका माऊलीने सत्याचा मार्ग निवडून आपल्या सुनांना सुरक्षिततेची खात्री दिली. समाजातील 'सासू' या प्रतिमेला या घटनेने एक वंदनीय उंची मिळवून दिली आहे. न्यायाधीशांनी दिलेला रामचरितमानसचा संदर्भ आणि आईने दिलेली साक्ष यामुळे पीडित सुनांना केवळ न्यायच मिळाला नाही, तर समाजात ताठ मानेने जगण्याचे बळही मिळाले आहे.

हेही वाचा - रेडी-टू-ईट 'डोसा'ने घेतला दोन चिमुरड्यांचा जीव? आई-वडीलही मृत्यूच्या दारात, सत्य समोर


सम्बन्धित सामग्री