पुणे : एमपीएससीची पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षा या दोन्ही परीक्षा २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी होणार होत्या. यामुळे दोन्ही परीक्षा देणार असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. ही बाब लक्षात येताच एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करणार आहे. हा निर्णय झाला तरी पुण्यात काही विद्यार्थी आंदोलन करत होते. एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचाही समावेश करावा, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू ठेवले होते. अखेर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी इंगा दाखवला आणि काही जणांना ताब्यात घेतले. पोलिसांचा पवित्रा बघून विद्यार्थ्यांनी आंदोलन गुंडाळले.