Friday, March 13, 2026 11:05:04 PM

Rajmata Jijau Buses : एसटीच्या ताफ्यात आता 'राजमाता जिजाऊ' बस; पाहा कधीपासून सुरू आणि काय आहेत खास सुविधा

महाराष्ट्राची प्रेरणा असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ही नवीन बस सेवा सुरू केली जात आहे. ही ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रवाशांची नवी ओळख ठरणार आहे.

rajmata jijau buses  एसटीच्या ताफ्यात आता राजमाता जिजाऊ बस पाहा कधीपासून सुरू आणि काय आहेत खास सुविधा

Rajmata Jijau Buses : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यात एक नवीन आणि ऐतिहासिक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवनेरी, शिवशाही आणि हिरकणी यांसारख्या लोकप्रिय बस सेवांनंतर आता राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नवीन बस सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सन्मानजनक करण्यासाठी ही सेवा सुरू केली जात असून, यामुळे एसटीच्या ताफ्यात आधुनिकतेची नवी लाट येणार आहे.

ऐतिहासिक वारसा आणि आधुनिकतेचा संगम
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राची प्रेरणा असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ही नवीन बस सेवा सुरू केली जात आहे. एसटी महामंडळाने नेहमीच महाराष्ट्रातील ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा आदर राखला आहे. शिवनेरी (पुणे-मुंबई), शिवशाही (एसी बस) आणि शिवाई (इलेक्ट्रिक) यांच्यानंतर आता 'राजमाता जिजाऊ' बस ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रवाशांची नवी ओळख ठरणार आहे.

हेही वाचा - Best Bus For Students : आता परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यात अडचण नाही, विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट'चा मोठा निर्णय

आसन व्यवस्था, बसचे स्वरूप आणि प्रवाशांची सुरक्षितता
वाढती गर्दी आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन या बसची रचना विशेष पद्धतीने करण्यात आली आहे:
- आसन रचना: या बसमध्ये 3 बाय 2 अशा पद्धतीची आसन रचना असेल, ज्यामुळे एकाच वेळी 55 प्रवासी प्रवास करू शकतील.
- आरामदायी प्रवास: लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना उभे राहावे लागू नये आणि बसमध्ये पुरेशी जागा असावी, यावर भर देण्यात आला आहे.
- रंगसंगती: ही बस आकर्षक भगव्या आणि पांढऱ्या रंगात सजलेली असेल, जी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवेल.
- या आधुनिक बसमध्ये आरामदायी आसनांसह आपात्कालीन दरवाजा, अग्निशमन यंत्रणा आणि प्रवाशांच्या सामानासाठी प्रशस्त डिक्कीची सोय करण्यात आली आहे.
- महिला प्रवाशांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या बसमध्ये आरक्षित जागांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.

कधीपासून धावणार 'राजमाता जिजाऊ'?
प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली असून, मार्च 2026 पासून या बस टप्प्याटप्प्याने राज्याच्या विविध आगारांमध्ये दाखल होतील. सुरुवातीला राज्यभरातील अतिशय वर्दळीच्या आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवर या गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांना ही 'राजमाता' बस सेवा अनुभवायला मिळेल. एसटीच्या या निर्णयामुळे खाजगी बस गाड्यांकडे वळलेला प्रवासी पुन्हा एकदा लाल परीच्या या नवीन रूपाकडे आकर्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - MSRTC Strike : ST कर्मचाऱ्यांचा एल्गार; 3 दिवसांत 'या' मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा


सम्बन्धित सामग्री