मुंबई : मुंबई - गोवा महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी. च्या टप्प्यातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त कामं शिल्लक आहेत. नागोठणे, कोलाड या ठिकाणी वाहने चालवण्यासाठी रस्ता नाही. माणगाव, इंदापूर येथे गतवर्षी केलेल्या डांबरीकरणावर पेव्हर ब्लॉक लावले जात आहेत. गणेशोत्सवाला कमी कालावधी उरला आहे. यामुळे यंदाही मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे कंत्राटदारांच्या मदतीने मोठे खड्डे भरुन रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. पेणपासून कोलाडपर्यंतच्या रस्त्याची अवस्था वाईट आहे. नागोठणे ते कशेडी घाटरस्ता येथे दरड कोसळण्याचा धोका आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यात दरड कोसळून दगडमाती रस्त्यावर येण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे या भागांतून प्रवास करणे त्रासदायक झाले आहे.