मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिले असून, मुंबईत 300 नव्या लोकल ट्रेन्स दिल्या जाणार आहेत. वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने केंद्र सरकारने तीन मोठ्या परियोजनांना मंजुरी दिली आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडणारा महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर तयार होणार आहे.
याशिवाय, मध्य रेल्वेमधील परेल, एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस), कल्याण, आणि पनवेल या स्थानकांच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. तसेच, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनल्स उभारण्यात येतील, तर वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभे केले जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत, मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त 300 लोकल्सचा समावेश करण्यात येणार आहे.