मुंबई : प्रदुषणाचे प्रमाण वाढल्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता 115 एवढी आहे. हवेची गुणवत्ता 0 ते 50 दरम्यान असल्यास हवा अत्युत्तम समजली जाते तर हवेची गुणवत्ता 50 ते 100 दरम्यान असल्यास हवेची गुणवत्ता बरी समजली जाते. हवेतील कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायक्साईड यांचे प्रमाण वाढत आहे. हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे. या याचिकेद्वारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मुंबई महानगर क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
वाढते नागरीकरण आणि त्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात ठिकठिकाणी सुरू असलेले बांधकाम यामुळे हवेत धूळ, माती, सिमेंट यांचे कण मिसळत आहेत. यातून हवेच्या प्रदुषणात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून जिथे रेडीमिक्स सिमेंटची निर्मिती होते तिथे तसेच सिमेंट मिक्सर यंत्र ज्या ठिकाणी वापरली जातात त्या सर्व ठिकाणी धूळ कमी प्रमाणात उडावी यासाठी आवश्यक ते उपाय करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बांधकाम क्षेत्राशी संबंधित असलेल्यांशी समन्वय साधून प्रदूषण कमी करण्याचे उपाय सुरू केले आहेत. जिथे बांधकाम सुरू आहे ते ठिकाण तसेच सिमेंट निर्मितीच्या यंत्राच्या भोवताली बारीक जाळीचे कव्हर बसवून धुलीकण वातावरणात मिसळण्याचे प्रमाण नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. बांधकाम स्थळांवर संध्याकाळी काम पूर्ण झाल्यावर पाणी शिंपडून धुलीकण वातावरणात मिसळण्याचे प्रमाण नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिमेंट निर्मिती कारखाना तसेच बांधकामाचे ठिकाण येथे आसपास वृक्ष लागवड करुन प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांनुसार अमलात आणलेले प्रदूषण नियंत्रणाचे उपाय
- ज्या ठिकाणावरुन धूळ उडण्याची शक्यता आहे तो भाग बारीक जाळीचे कव्हर वापरुन झाकणे आणि प्रदूषण नियंत्रणात आणणे
- ज्या ठिकाणावरुन धूळ उडण्याची शक्यता आहे त्या भागाभोवताली वृक्षारोपण करणे. किमान 5 मीटर रुंदी असलेल्या आरएमसी परिसराच्या किमान तीन बाजूंनी सीमेच्या आतील बाजूने वृक्षारोपण केल्याने झाडांची पाने सुमारे 20 फूट उंचीचा भाग पुरेशा प्रमाणात व्यापतात.
- ज्या ठिकाणावरुन धूळ उडण्याची शक्यता आहे त्या भागातले काम संपल्यावर पाणी शिंपडून धुलीकण वातावरणात मिसळण्याचे प्रमाण नियंत्रणात आणणे
- ज्या भागात धूळ हमखास निर्माण होते आणि नियंत्रणात आणणे कठीण आहे त्या भागात अधूनमधून पाण्याचे फवारे मारणे. यासाठी 50 मीटर वॉटर मिस्ट फॉग सिस्टिमचा वापर करणे
- ज्या ठिकाणावरुन धूळ उडण्याची शक्यता आहे त्या भागातून निघण्याआधी वाहने पाण्याने धुणे आणि त्यावरील धुलीकण हटवणे
- बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा पोत्यांमध्ये भरुन त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे