मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वांद्रे - वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं अर्थात सागरी किनारा मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं. या मार्गामुळे पाऊण तासाचं अंतर १० मिनिटात पार होणार आहे. लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अजित पवार या सोहळ्याला अनुपस्थित होते. पण ते महायुतीत आहेत आणि राहणार अशी ग्वाही शिंदे आणि फडणवीस यांनी दिली.
सागरी किनारा मार्गाच्या तिसऱ्या टप्प्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल. मुंबईच्या सागरी किनारा मार्गाचा वाढवण बंदरालाही फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर महायुतीनं सुरू केलेला प्रकल्प महायुतीनंच पूर्ण केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
'आधी २५ वर्ष सागरी किनारा मार्गाची चर्चा झाली. पण भाजपा - शिवसेना सरकार २०१६ मध्ये सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग आला. सरकारी परवानगीशी संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. नंतर उद्धव यांच्या आग्रहामुळे प्रकल्प मुंबई महापालिकेला सोपवला. मध्यंतरी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींचा प्रकल्पाच्या वेगावर परिणाम झाला. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आल्यावर या प्रकल्पाने पुन्हा वेग घेतला. आता प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले'; असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे चालक उपमुख्यमंत्री
सागरी किनारा मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या रस्त्यावरुन गाडीतून एक फेरी मारली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे चालक उपमुख्यमंत्री झाले होते. मुख्यमंत्री शिंदे यांची गाडी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चालवली.