Saturday, March 07, 2026 02:55:54 AM

Mumbai To Sindhudurg : मुंबई ते सिंधुदुर्ग अवघ्या 6 तासांत! एप्रिलपासून प्रवास होणार सुसाट, कसा असेल मार्ग आणि तिकीट दर?

सध्या रस्ते मार्गाने मुंबई ते विजयदुर्ग प्रवासाला 10 ते 12 तास लागतात. मात्र, रो-रो फेरीमुळे हा प्रवास केवळ 5 ते 6 तासांत पूर्ण होईल. म्हणजेच प्रवाशांचा निम्म्याहून अधिक वेळ वाचणार आहे.

mumbai to sindhudurg  मुंबई ते सिंधुदुर्ग अवघ्या 6 तासांत एप्रिलपासून प्रवास होणार सुसाट कसा असेल मार्ग आणि तिकीट दर

Mumbai To Sindhudurg Sea Route: मुंबई ते कोकण हा प्रवास सध्याच्या वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे प्रवाशांसाठी कसरतीचा ठरत आहे. मात्र, कोकणवासीयांची ही प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते सिंधुदुर्ग (विजयदुर्ग) दरम्यान बहुप्रतीक्षित रो-रो (Ro-Ro) सेवा सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. एप्रिल 2026 पासून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या रस्ते मार्गाने मुंबई ते विजयदुर्ग प्रवासाला 10 ते 12 तास लागतात. मात्र, रो-रो फेरीमुळे हा प्रवास केवळ 5 ते 6 तासांत पूर्ण होईल. म्हणजेच प्रवाशांचा निम्म्याहून अधिक वेळ वाचणार आहे.

अनेक अडथळ्यांनंतर सेवेला गती
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा ऑगस्ट 2025 मध्ये गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, तांत्रिक परवानग्या आणि खराब हवामानामुळे हा मुहूर्त हुकला. आता महाराष्ट्र सागरी मंडळाने पुन्हा हालचाली सुरू केल्या असून, नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या प्रक्रियेनुसार, मार्च 2026 पर्यंत कंत्राटदार नियुक्तीचे काम पूर्ण होईल आणि एप्रिल 2026 मध्ये ही सेवा प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला महिनाभर ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाईल आणि यश मिळाल्यास ती कायमस्वरूपी सुरू राहील.
प्रवासाचा मार्ग आणि वेळ, गाड्यांची ने-आण आणि क्षमता
ही जलवाहतूक मुंबईतील भाऊचा धक्का (Ferry Wharf) येथून सुटेल आणि थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग बंदरात पोहोचेल. हा प्रवास केवळ 5 ते 6 तासांत पूर्ण होईल. म्हणजेच रस्ते मार्गापेक्षा निम्म्या वेळेत प्रवास पूर्ण करता येईल. ही बोट 25 नॉट्स वेगाने धावणारी असून दक्षिण आशियातील वेगवान प्रवासी नौकांपैकी एक असणार आहे. रो-रो सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवासी आपल्या सोबत स्वतःची वाहनेही नेऊ शकतात. विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रूपांतर आता रो-रो जेट्टीत करण्यात आले आहे, ज्यामुळे कार आणि दुचाकी बोटीवर चढवणे सोपे झाले आहे. या सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या M2M Princess सारख्या नौकेची क्षमता सुमारे 650 प्रवासी आणि 50 कार तसेच 30 दुचाकी वाहून नेण्याची आहे. यामुळे पर्यटकांना कोकणात उतरल्यावर पुढे स्वतःच्या गाडीने प्रवास करणे अधिक सोयीचे होईल.

हेही वाचा - Ratnagiri Sports Complex : रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब! 23 कोटींचे भव्य जिल्हा क्रीडा संकुल अंतिम टप्प्यात

अपेक्षित तिकीट दर आणि सोयी
अधिकृत वेळापत्रक आणि दरपत्रक अजून जाहीर झालेले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार तिकीट दर खालीलप्रमाणे असू शकतात:
प्रवासी तिकीट (Economy): 2,500 रुपयांपासून सुरुवात.
दुचाकी वाहन: सुमारे 1,000 रुपये.
चारचाकी वाहन (Car): सुमारे 6,000 रुपये.
प्रवाशांसाठी इकॉनॉमी, बिझनेस आणि फर्स्ट क्लास असे प्रवासाचे विविध पर्याय उपलब्ध असतील, ज्यामुळे बजेटनुसार प्रवासाची निवड करता येईल.

कोकणच्या पर्यटनाला नवे वलय
ही सेवा सुरू झाल्यामुळे केवळ चाकरमान्यांनाच नाही, तर पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच विजयदुर्ग किल्ल्याचे सौंदर्य आणि कोकणचा निसर्ग पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. एप्रिलमधील उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात ही सेवा सुरू झाल्यास त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Glorious History of Shivaji Maharaj : शिवरायांच्या पराक्रमाला पॅरिसमध्ये मानाचा मुजरा! महाराष्ट्राच्या 12 किल्ल्यांना UNESCOचे जागतिक वारसा प्रमाणपत्र


सम्बन्धित सामग्री