Sunday, February 15, 2026 07:46:25 AM

मी एलॉन मस्क.. विल यू मॅरी मी?'..लग्नाच्या प्रपोजलने हुरळली महिला; पुढे जे घडलं ते वाचून हादराल!

चेंबूर परिसरातील एका 40 वर्षीय महिलेला सायबर भामट्यांनी चक्क 'एलॉन मस्क' बनून आपल्या जाळ्यात ओढले. आपण खऱ्या एलॉन मस्कशी बोलत आहोत, अशा भ्रमात राहिलेल्या या महिलेची मोठी फसवणूक झाली आहे.

मी एलॉन मस्क विल यू मॅरी मीलग्नाच्या प्रपोजलने हुरळली महिला पुढे जे घडलं ते वाचून हादराल

Fake Elon Musk's Marriage Proposal and Money Fraud : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहणे एका मुंबईकर महिलेसाठी अत्यंत महागडे ठरले आहे. चेंबूर परिसरातील एका 40 वर्षीय महिलेला सायबर भामट्यांनी चक्क 'एलॉन मस्क' बनून आपल्या जाळ्यात ओढले. 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरून सुरू झालेली ही ओळख पुढे लग्नाच्या प्रस्तावापर्यंत पोहोचली. आपण खऱ्या एलॉन मस्कशी बोलत आहोत, अशा भ्रमात राहिलेल्या या महिलेची तब्बल 16.34 लाखांची फसवणूक झाली. या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे.

फसवणुकीची अजब कार्यपद्धती
आरोपीने 'एक्स'वर एलॉन मस्कच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून महिलेला मेसेज केला. हळूहळू विश्वासात घेऊन त्याने तिला एका वेगळ्या मेसेजिंग ॲपवर चॅटिंग करण्यास प्रवृत्त केले.
लग्नाचे प्रपोजल: "तू माझ्याशी लग्न करशील का? आपण अमेरिकेत एकत्र राहू," असे आमिष दाखवून तिला प्रेमजाळ्यात अडकवले.
व्हिसाचा सापळा: अमेरिकेला नेण्यासाठी 'जेम्स' नावाच्या एका मध्यस्थाची ओळख करून दिली, ज्याने व्हिसा प्रक्रियेसाठी पैशांची मागणी केली.

अमेझॉन गिफ्ट कार्ड्सचा वापर
तपासात असे समोर आले की, आरोपींनी महिलेला थेट बँक ट्रान्सफर करण्याऐवजी अमेझॉन गिफ्ट कार्ड्स (Amazon Gift Cards) खरेदी करण्यास सांगितले. व्हिसा आणि इतर प्रशासकीय शुल्काच्या नावाखाली या कार्ड्सचे कोड आरोपींनी स्वतःकडे मागवून घेतले. ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेला हा सिलसिला जानेवारी 2026 पर्यंत सुरू होता. या काळात पीडित महिलेने हप्त्या-हप्त्याने एकूण 16 लाख 34 हजार रुपये खर्च केले.

हेही वाचा - Georgia Shooting : अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीचे क्रूर कृत्य; तीन नातेवाईक आणि पत्नीवर झाडल्या गोळ्या

असा झाला भांडाफोड
या प्रेमप्रकरणाचा फुगा 15 जानेवारी रोजी फुटला, जेव्हा 'जेम्स'ने विमानाचे तिकीट काढण्यासाठी अतिरिक्त 2 लाख रुपयांची मागणी केली. वारंवार पैसे देऊनही काहीच हाती लागत नसल्याने महिलेला संशय आला. तिने पैसे देण्यास नकार देताच, आरोपींनी तिला अमेरिकेला नेता येणार नाही असे सांगून संवाद तोडला. त्यानंतर कथित 'मस्क'नेही तिला ब्लॉक केले. धक्का बसलेल्या महिलेने आपल्या पालकांना ही हकीकत सांगितली आणि त्यांच्या सल्ल्याने सायबर पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांचा इशारा आणि सतर्कतेचे आवाहन
मुंबई सायबर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 318,319 आणि 61 सह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. "आरोपीने स्वतःची ओळख लपवून एलॉन मस्क असल्याचे भासवले आणि लग्नाचे आमिष दाखवून गंडा घातला. यावरून फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याला बळी पडू नका आणि कोणालाही आपले वैयक्तिक डिटेल्स किंवा पैसे देऊ नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - Gold Smuggling Crime: DRI ने उद्ध्वस्त केलं आंतरराष्ट्रीय गोल्ड स्मगलिंग रॅकेट; तब्बल 40 कोटींचं सोनं जप्त, दोघांना अटक


सम्बन्धित सामग्री