Saturday, March 07, 2026 03:08:19 AM

Canara Bank Fraud : कॅनरा बँकेने केला कहर! 90 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला विकली 2126 मध्ये मॅच्युअर होणारी पॉलिसी; आयुष्यभराची पुंजी धोक्यात

अय्यर यांनी बँक मॅनेजरवर पूर्ण विश्वास टाकला होता, परंतु त्यांच्या वाढत्या वयाचा आणि मर्यादित आर्थिक समजुतीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.

canara bank fraud  कॅनरा बँकेने केला कहर 90 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला विकली 2126 मध्ये मॅच्युअर होणारी पॉलिसी आयुष्यभराची पुंजी धोक्यात

Canara Bank Fraud : बँकिंग क्षेत्रातील विश्वासाला तडा देणारी एक संतापजनक घटना महाराष्ट्रातील नागपूरमधून समोर आली आहे. कॅनरा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एका 90 वर्षांच्या वृद्धाला चुकीच्या पद्धतीने आयुर्विमा पॉलिसी विकल्याचा आरोप होत आहे. वेंकटचलम व्ही. अय्यर असे या वृद्ध ग्राहकाचे नाव असून, ते गेल्या अनेक दशकांपासून याच बँकेचे ग्राहक आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वयात माणसाला पैशांची नितांत गरज असते, अशा वेळी त्यांना वार्षिक 2 लाख रुपये प्रीमियम असलेली पॉलिसी जबरदस्तीने स्वीकारायला लावण्यात आली. या पॉलिसीची मॅच्युरिटी वर्ष 2126 असून, वृद्धाच्या वयाचा विचार करता हा प्रकार अत्यंत संशयास्पद वाटत आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमुळे फुटले भांडे
हा संपूर्ण प्रकार साकेत आर. नावाच्या एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर शेअर केल्यानंतर उघडकीस आला. साकेत यांनी सांगितले की, अय्यर हे त्यांच्या पत्नीचे आजोबा आहेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव आणून या पॉलिसीवर स्वाक्षरी करून घेतली. पॉलिसीचा फॉर्मदेखील बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच भरला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये या पॉलिसीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि अय्यर यांच्या बचत खात्यातून 2 लाख रुपये कापले गेले. जेव्हा त्यांना दुसऱ्या हप्त्याचा मेसेज आला, तेव्हा त्यांना हा प्रकार समजला आणि त्यांनी कुटुंबाला माहिती दिली.

विश्वासाचा गैरफायदा आणि नियमांचे उल्लंघन
अय्यर यांनी बँक मॅनेजरवर पूर्ण विश्वास टाकला होता, परंतु त्यांच्या वाढत्या वयाचा आणि मर्यादित आर्थिक समजुतीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. पॉलिसी अत्यंत आवश्यक आणि अर्जंट असल्याचे सांगून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. धक्कादायक म्हणजे, नियमांना बगल देण्यासाठी बँक मॅनेजरने आधी अय्यर यांना त्यांच्या मुलीसोबत जॉइंट अकाउंट उघडण्यास सांगितले. त्यानंतर मुलीला 'लाइफ एश्योर्ड' दाखवून प्रीमियमचे पैसे मात्र अय्यर यांच्या खात्यातून कापले गेले. आतापर्यंत त्यांच्या कष्टाच्या कमाईतील 4 लाख रुपये या पॉलिसीमध्ये अडकले आहेत.

हेही वाचा - Cyber Fraud Case: सावधान; गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधताय? ही एक चूक अन् बँक खाते रिकामे, काय घडलं महिलेसोबत?

2126 ची मॅच्युरिटी आणि नेटकऱ्यांचा संताप
सोशल मीडियावर या घटनेचा सर्वाधिक निषेध पॉलिसीच्या मॅच्युरिटी तारखेवरून होत आहे. 2126 मध्ये मॅच्युअर होणारी पॉलिसी एका 90 वर्षांच्या व्यक्तीला देणे, हे शुद्ध फसवणुकीचे आणि 'मिस-सेलिंग'चे लक्षण असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत कोणी तरुण व्यक्तीही जिवंत राहणे अशक्य असताना अशा अटींची पॉलिसी देणे हे बँकिंग नैतिकतेच्या विरोधात आहे. अनेक युजर्सनी हे प्रकरण भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि विमा नियामक संस्था (IRDAI) कडे नेण्याचा सल्ला दिला आहे.

बँकेचे उत्तर आणि पुढील कारवाई
या प्रकरणावर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाल्यानंतर केनरा बँकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. बँकेने म्हटले आहे की, "प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल आम्हाला खेद आहे आणि हे प्रकरण संबंधित टीमकडे चौकशीसाठी पाठवले आहे." मात्र, बँकेने अद्याप या गंभीर आरोपांवर ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही. नियमांनुसार, जर बँकेने 30 दिवसांत यावर समाधानकारक तोडगा काढला नाही, तर ग्राहक लोकपालाकडे धाव घेऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही घटना संपूर्ण बँकिंग क्षेत्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

हेही वाचा - US-Bangladesh Trade Deal: विश्वासघातकी अमेरिका? भारतासोबतचा करार पूर्ण होताच बांगलादेशला 'झिरो टॅरिफ'ची भेट


सम्बन्धित सामग्री