Wednesday, November 19, 2025 02:11:01 PM

Navi Mumbai Airport: आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन; मेट्रो-3चा अंतिम टप्पाही लोकार्पित होणार; कसा असेल पंतप्रधानांचा मुंबई दौरा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत.

navi mumbai airport आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन मेट्रो-3चा अंतिम टप्पाही लोकार्पित होणार कसा असेल पंतप्रधानांचा मुंबई दौरा

Navi Mumbai Airport: नवी मुंबईमध्ये आज एक ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी दिली जाईल. विमानतळावर उतरल्यावर पंतप्रधान प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतील आणि टर्मिनल इमारत, रनवे, पार्किंग आणि इतर सुविधांचा आढावा घेतील. या उद्घाटनानंतर विमानसेवा सुरळीतपणे सुरू होण्यापूर्वी नागरिकांना अंदाजे दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवीन विमानतळामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: मान्सून परतीच्या मार्गावर; पण बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राच्या दिशेने येतंय नवीन संकट, हवामान विभागाचा इशारा

विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त, महाराष्ट्रातील विविध लोककलेचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. सिडको महामंडळ आणि अदानी समूहाने संयुक्तपणे कोल्हापुरातील लावणी, नाशिकचा दहीहंडी नृत्य, विदर्भातील गोंधळी, कोकणातील झेलक्यांचा ठेका तसेच आदिवासी व आगरी-कोळी नृत्यांचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमांमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण अधिक रंगीबेरंगी आणि उत्साहवर्धक होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकूण 1160 हेक्टर क्षेत्रावर उभारले गेले असून, त्यासाठी 1 लाख कोटींहून अधिक खर्च झाला आहे. विमानतळावर दोन रनवे आहेत आणि 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. पॅसेंजर आणि कार्गो दोन्ही सुविधा येथे आहेत. विमानतळ पर्यावरणपूरक असून, हरित उर्जा, जलसंधारण आणि इतर पर्यावरणीय उपाय यावर भर दिला गेला आहे. टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर विविध ऑपरेशनमध्ये केला जाणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील सुमारे 70 टक्के लोड कमी होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल.

हेही वाचा: CM Devendra Fadnavis : फडणवीस सरकारची मोठी घोषणा! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर

आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते फक्त विमानतळाचं उद्घाटनच नाही, तर मुंबई मेट्रो-3 च्या अंतिम टप्प्याचं लोकार्पणही होणार आहे. याशिवाय मेट्रो, लोकल आणि बसच्या तिकिटांसाठी 'मुंबई वन' या एकाच ऍपवर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, ‘अल्प कालावधीच्या रोजगारक्षम कार्यक्रमाचा’ प्रारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यामुळे नवी मुंबई आणि मुंबईतील नागरिकांना फायदेशीर सुविधांचा लाभ होणार आहे. लोककला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण या उद्घाटन सोहळ्याला खास महत्व देत आहे.


सम्बन्धित सामग्री