देशभरात सध्या तामिळनाडूमधील राजकारणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. थलापती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याबरोबरच त्यांच्या मंत्रिमंडळाचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यामध्ये अवघ्या 29 वर्षांच्या एस. कीर्तना या विजय यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या सर्वात तरुण आमदार बनल्या आहेत. त्यांनी विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून, त्या तामिळनाडूच्या राजकारणातील पक्षाच्या नव्या चेहऱ्यांपैकी एक बनल्या आहेत.
रविवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेण्यापूर्वी कीर्तना म्हणाल्या, "मी नेहमीच स्वतःला राजकारणात पाहत आले आहे, म्हणूनच मी राजकीय रणनीतीकार म्हणून करिअर निवडले." त्या पुढे म्हणाल्या, "मी वेगवेगळ्या नेत्यांसोबत काम केले आणि यंत्रणा कशी चालते व नोकरशाही कशी काम करते हे समजून घेतले."
एस. कीर्तना कोण आहेत?
1996 मध्ये विरुधुनगर येथे जन्मलेल्या कीर्तनाने राजकीय सल्लागार म्हणून कारकीर्द सुरू करण्यापूर्वी तमिळ-माध्यम सरकारी शाळेत शिक्षण घेतले. त्यांनी मदुराई कामराज विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातून गणितात बी.एस्सी. पूर्ण केले आणि नंतर 2019 मध्ये पुदुचेरी विद्यापीठातून सांख्यिकीमध्ये एम.एस्सी. पदवी मिळवली. सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी, कीर्तनाने शोटाइम कन्सल्टिंग आणि आयपॅक (IPAC) मध्ये राजकीय सल्लागार आणि डिजिटल मोहीम रणनीतीकार म्हणून काम केले. तिने तेलगू देसम पार्टी (टीडीपी), तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) यांच्या निवडणूक प्रचारातही सहभाग घेतला होता.
या विधानसभा निवडणुकीत, कीर्तना यांनी 68,709 मते मिळवून काँग्रेसचे उमेदवार अशोकन जी. यांचा 11,370 मतांच्या फरकाने पराभव केला. गेल्या सात दशकांत शिवकाशीमधून एका माजी एआयएडीएमके मंत्र्याला पराभूत करणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार आहेत.
टीव्हीकेची निवड करण्यामागचे कारण स्पष्ट करताना कीर्तना म्हणाल्या, "टीव्हीके हे असे ठिकाण आहे जिथे प्रत्येकाला प्रवेश मिळतो. माझी राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसली तरीही मी तिथे आहे. जर तुमची लोकांसाठी काही करण्याची इच्छा असेल, तर तुमचे स्वागत आहे".