Delivery boy Threatens Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. एका फूड डिलिव्हरी बॉयने राज ठाकरे यांना 'शूट' करणार असल्याचे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित आरोपीला शोधून काढले. राज ठाकरे यांच्यासारख्या बड्या नेत्याला अशा प्रकारे जाहीर धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास चक्रे फिरवून कैलास बोकोलिया या तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीमध्ये असे समोर आले आहे की, संशयित आरोपीने दारूच्या नशेत असताना हा सर्व प्रकार केला आणि राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. सध्या पोलिसांनी त्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा - Branded Watch Stolen: प्रियकराच्या प्रेमात तरुणी झाली बेभान; वाढदिवसाला महागडे गिफ्ट देण्यासाठी थेट चोरले घडयाळ; सीसीटीव्हीने उघडले गुपित
पोलीस प्रशासनाची तत्परता
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि तुर्भे पोलीस स्टेशनने त्वरित पावले उचलली. 16 एप्रिल रोजी ही बाब समोर येताच सोशल मीडिया आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढण्यात आला. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही कसर सोडू नये, असे आदेश देण्यात आले होते. मद्यधुंद अवस्थेत दिलेली असली तरी, एका सार्वजनिक नेत्याला दिलेली ही धमकी गांभीर्याने घेत पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.