Monday, May 11, 2026 11:31:37 AM

NCERT Maratha Empire Map Controversy : मराठा साम्राज्य दाखवणारा नकाशा पाठ्यपुस्तकातून हटवला; NCERT चा एकतर्फी निर्णय, साताऱ्यात शिवप्रेमींकडून निषेध

आधी हिंदी आणि आता इंग्रजी भाषेतील NCERT च्या पाठ्यपुस्तकातूनही वर्ष 1759 चा नकाशा वगळण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या बोलण्याचीही NCERT ने काहीही दखल घेतली नाही.

ncert maratha empire map controversy  मराठा साम्राज्य दाखवणारा नकाशा पाठ्यपुस्तकातून हटवला ncert चा एकतर्फी निर्णय साताऱ्यात शिवप्रेमींकडून निषेध

Maharashtra Protest NCERT Maratha Map Controversy : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात एनसीईआरटीने (NCERT) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आधी हिंदी आणि आता इंग्रजी भाषेतील पाठ्यपुस्तकातूनही वर्ष 1759 चा नकाशा वगळण्यात आला आहे. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधिमंडळात या प्रकरणी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र, त्यांच्या शब्दाची काहीही दखल न घेता एनसीईआरटीने आपली कृती सुरूच ठेवली आहे. यामुळे राज्य सरकारच्या केंद्रातील वजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

साताऱ्यात विराट मोर्चा आणि राजघराण्याचा सहभाग
एनसीईआरटीच्या या निर्णयाविरोधात साताऱ्यात आज शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निषेधार्थ साताऱ्यातील शिवतीर्थ येथून सकाळी 10:00 वाजता एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती घराण्यातील वृषालीराजे भोसले स्वतः रस्त्यावर उतरल्या आहेत. मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास विद्यार्थ्यांपासून लपवण्याचे कारस्थान खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी शिवप्रेमींनी दिला आहे.

राजपूत घराण्यांच्या दबावाचा आरोप
नागपूरच्या भोसले राजघराण्याचे वंशज मुधोजीराजे भोसले यांनी या प्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, राजस्थानमधील काही राजघराणी आणि राजपूत संघटनांच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारने हा नकाशा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ..
- वर्ष 1759 मधील 'कटक ते अटक' असा मराठ्यांचा साम्राज्य विस्तार या नकाशात दाखवण्यात आला होता.
- राजस्थानमधील काही संघटनांनी हा नकाशा चुकीचा असल्याचा दावा करत तो हटवण्याची मागणी लावून धरली होती.
- मुधोजीराजे भोसले यांनी हा नकाशा शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या पुस्तकात पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - Ashok Kharat Case: भोंदू खरातचे 32 बेनामी बँक व्यवहार उघड; 'या' पतसंस्थेच्या मॅनेजरला अटक

तथ्यांशी छेडछाड केल्याची टीका
एनएसयूआयचे (NSUI) राज्य सचिव विक्रांत सिंह परिहार यांनी या प्रकरणाला अत्यंत दुर्दैवी म्हटले आहे. इतिहास हा पुराव्यांवर आधारित असतो, कोणत्याही राजकीय सोयीवर किंवा विचारसरणीवर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञ समितीची मंजुरी न घेता राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने ऐतिहासिक नकाशे हटवणे ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानाशी केलेली प्रतारणा आहे. एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या सर्व नकाशांचे स्वतंत्र पुनरावलोकन करून विद्यार्थ्यांसमोर अस्सल इतिहास मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

नकाशा हटवण्याचे नेमके कारण
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील काही लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे तक्रार केली होती की, मराठ्यांचे राजस्थानमधील काही भागांवर अधिपत्य नव्हते. या वादाला पूर्णविराम देण्यासाठी एनसीईआरटीने वादात असलेला तो नकाशाच पुस्तकातून बाद केला आहे. आता 294 सदस्यीय विधानसभेच्या राजकारणात आणि दिल्लीच्या दरबारी या प्रकरणाचे पडसाद उमटत असून, महाराष्ट्रातील अस्मितेचा हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा - Sanjay Nirupam: प्रताप सरनाईक यांच्या भाषा सक्तीला पक्षातूनच विरोध, संजय निरुपम यांची मागणी काय?


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या