पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महायुतीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली.
ईव्हीएम संदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी काही आक्षेप घेतले आहेत. त्यांनी ईव्हीएमला विरोध करण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. बाबा आढाव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. आढाव यांनी उपोषण मागे घ्यावे आणि प्रकृतीची काळजी घ्यावी, आवश्यक ते उपचार करुन घ्यावे; अशी विनंती अजित पवार यांनी केली.
याआधी राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान झाले. ईव्हीएमद्वारे कोट्यवधी मते नोंदवली गेली. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली. निकाल जाहीर झाला. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमला विरोध सुरू केला. विशेष म्हणजे ईव्हीएमद्वारे मते मिळवून विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी स्वतःच्या निकालाविषयी शंका व्यक्त केली नाही. पण महाविकास आघाडीने त्यांच्या पराभूत झालेल्या उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या. यानंतर बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात उपोषण सुरू केले. उपोषणाचा तिसरा दिवस आहे. बाबा आढाव यांची तब्येत खालावत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ झाला. ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले, त्यात काहीतरी घोटाळा झाला, असे बाबा आढाव म्हणाले. मतदानात काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. बाबा आढाव यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर अजित पवारांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. निवडणूक प्रक्रिया हा निवडणूक आयोगाचा विषय आहे. ही प्रक्रिया राबवण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडे आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. जनतेचा एकदा कौल आला की तो मान्य केला पाहिजे. दिल्ली सरकारने नागरिकांना अनेक मोफत योजना दिल्या. इतर अनेक राज्यांनीही मोफत योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली. जनतेनं कोणावर किती विश्वास ठेवावा आणि कसं मतदान करायचं याचं त्यांना स्वातंत्र्य आहे; असे अजित पवार म्हणाले. लोकसभेला ईव्हीएम चांगलं होतं. विरोधकांची तक्रार नव्हती; याकडेही अजित पवारांनी बाबा आढाव आणि त्यांच्या समर्थकांचे लक्ष वेधले. ईव्हीएम संदर्भात न्यायालयाचा निर्णय मान्य करावाच लागेल; असेही अजित पवार म्हणाले.
कोण आहेत बाबा आढाव ?
बाबा आढाव हे 1970 मध्ये पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. ते तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते. रिक्षा पंचायतीचे काम करत होते. त्यांनी 'एक गाव एक पाणवठा' ही योजना राबवली होती. ते 94 वर्षांचे आहेत.