Friday, February 13, 2026 01:03:37 AM

FASTag Payment Error: अजब कारभार! गाडी घरी असतानाच 'फास्टॅग'मधून पैसे कट? NHAI कडून 18 लाख प्रकरणांत रिफंड

टोल भरणे सुलभ होण्यासाठी आणि टोलची रक्कम कमी करण्यासाठी सध्या फास्टॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, आता चक्क गाडी पार्किंगमध्ये असताना टोल वसुली केली गेल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.

fastag payment error अजब कारभार गाडी घरी असतानाच फास्टॅगमधून पैसे कट nhai कडून 18 लाख प्रकरणांत रिफंड

Wrong FASTag payment : तुमची गाडी पार्किंगमध्ये उभी असताना अचानक टोल कट झाल्याचा मेसेज आला तर? हा केवळ तांत्रिक बिघाड नसून आता सरकारी रेकॉर्डवर नोंद झालेली एक मोठी समस्या आहे. टोल प्लाझावर फार वेळ लागू नये आणि टोलची रक्कमही कमी लागावी, यासाठी सरकार फास्टॅगच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. याचा नागरिकांना फायदाही होत आहे. मात्र, आता नवीनच प्रकार घडल्याचा अनुभव काही लोकांना आला आहे. चक्क गाडी पार्किंगमध्ये असताना टोल वसुली केली गेल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.  

नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) या प्रकरणी मोठा खुलासा केला असून 2025 या एकाच वर्षात तब्बल 18 लाख प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने कापलेले पैसे ग्राहकांना परत केले आहेत. धक्कादायक म्हणजे, यातील अनेक प्रकरणांमध्ये गाडी टोल प्लाझावर गेलेलीच नव्हती.

मॅन्युअल एंट्रीमुळे बसतोय भुर्दंड
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडे 17.6 लाख चुकीच्या टोल कपातीचे व्यवहार नोंदवले गेले. याचे मुख्य कारण म्हणजे टोल प्लाझावरील 'मॅन्युअल एंट्री'. जेव्हा ऑटोमॅटिक स्कॅनरमध्ये तांत्रिक बिघाड होतो, तेव्हा कर्मचारी गाडीचा नंबर मॅन्युअली सिस्टममध्ये टाकतात. यावेळी एखाद्या अंकाच्या चुकीमुळे दुसऱ्याच वाहन मालकाच्या फास्टॅग वॉलेटमधून पैसे कापले जातात. एकूण 464 कोटी फास्टॅग व्यवहारांच्या तुलनेत हे प्रमाण जरी 0.03 टक्के असले, तरी सरकार याकडे गांभीर्याने पाहात आहे.

गाडीचा नंबर हाताने टाकण्याची पद्धत पूर्ण बंद करणार
लोकांच्या तक्रारी आणि सोशल मीडियावरील संताप लक्षात घेता, सरकार आता टोल नाक्यांवर वाहन क्रमांक हाताने (Manually) टाकण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्याचा विचार करत आहे. अर्थातच, यासाठी टोल प्लाझावर असलेल्या तांत्रिक समस्या पूर्णपणे सोडवाव्या लागतील. यामुळे चुकीच्या पद्धतीने होणारी कपात आणि मानवी चुका टाळता येतील. विशेष म्हणजे, फास्टॅगमुळे टोल नाक्यांवरील सरासरी वेळ 12.2 मिनिटांवरून केवळ 40 सेकंदांपर्यंत खाली आला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतच सरकारने 50,195 कोटी रुपयांचा टोल वसूल केला आहे. (मागील संपूर्ण आर्थिक वर्षात हा आकडा 61,508 कोटी रुपयांचा होता.) मात्र, ग्राहकांची लूट टाळणे हे प्राधान्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Amazon: वारंवार रिटर्न आणि रिफंड करणाऱ्यांसाठी मोठा इशारा! ॲमेझॉनचे नवे नियम जाणून घ्या

अलर्ट राहण्यासाठी 'असे' करा सेटअप
तुमचा फास्टॅग बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शन सुरक्षित ठेवण्यासाठी एसएमएस अलर्ट चालू असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुमच्या बँकेच्या फास्टॅग पोर्टलवर किंवा 'My FASTag' ॲपवर लॉग इन करा. तिथे 'मॅनेज अलर्ट' किंवा नोटिफिकेशन सेक्शनमध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन आणि लो बॅलेन्ससाठी एसएमएस अलर्ट ऑन करा. यामुळे पैसे कट होताच तुम्हाला तात्काळ मेसेज येईल आणि तुम्ही वेळीच तक्रार करू शकाल.

मिस्ड कॉलने तपासा बॅलन्स
जर तुम्हाला इंटरनेट किंवा ॲप वापरण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही केवळ एक मिस्ड कॉल देऊनही तुमचा बॅलन्स तपासू शकता. यासाठी +91-8884333331 या क्रमांकावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल द्या. जर तुमचे पैसे चुकीच्या पद्धतीने कापले गेले असतील, तर तात्काळ '1033' या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा किंवा बँकेच्या कस्टमर केअरला कळवा. वेळेत केलेली तक्रार तुमचे पैसे परत मिळवून देण्यास मदत करते.

हेही वाचा - Pune Mumbai ST Bus : पुणे-मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट! हिंजवडीतून थेट ST सुटणार; दीड तासाचा कोंडीचा त्रास कायमचा मिटणार


सम्बन्धित सामग्री