Alex Honnold : आपल्या जिगरबाज चढाईसाठी ओळखले जाणारे अमेरिकेचे रॉक क्लाइंबर ॲलेक्स होनॉल्ड यांनी पुन्हा एकदा अशक्य गोष्ट साध्य केली आहे. तैवानमधील 508 मीटर (1667 फूट) उंच असलेल्या 'तैपेई 101' या गगनचुंबी इमारतीवर त्यांनी कोणत्याही सुरक्षा दोरीशिवाय (Free Solo) चढाई करून नवा इतिहास रचला आहे. अवघ्या 90 मिनिटांत त्यांनी या इमारतीचे शिखर गाठले असून, अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
थरारक चढाई आणि 'बांबू बॉक्स'चे आव्हान
ॲलेक्स यांनी 101 मजली इमारतीच्या एका कोपऱ्याचा आधार घेत आपला प्रवास सुरू केला. इमारतीच्या बांधकामातील 'L' आकाराच्या लहान भागांवर पाय रोवत आणि हातांनी स्वतःला वर खेचत त्यांनी हे अंतर कापले. या चढाईतील सर्वात कठीण भाग म्हणजे इमारतीच्या रचनेतील मधले 64 मजले होते, ज्यांना 'बांबू बॉक्स' म्हटले जाते. ही रचना बाहेरच्या बाजूला झुकलेली असल्याने तिथे संतुलन राखणे अत्यंत जिकिरीचे होते. त्यातच उंचीवर असलेल्या वेगवान वाऱ्यामुळे ॲलेक्स यांना प्रत्येक हालचाल अतिशय सावधगिरीने करावी लागली.
हेही वाचा - Freestyle Fighting Video Viral : मसाजसाठी घरी आलेल्या थेरपिस्टची महिलेसोबत फ्री-स्टाईल हाणामारी; दोघींची तू-तू...मैं-मैं कॅमेऱ्यात कैद
नेटफ्लिक्सवर थेट प्रक्षेपण आणि जगभरातून कौतुक
या चित्तथरारक साहसाचे नेटफ्लिक्सवर थेट प्रक्षेपण (Live Telecast) करण्यात आले होते. मुळात ही चढाई शनिवारी होणार होती, परंतु पावसामुळे ती 1 दिवस पुढे ढकलण्यात आली होती. ॲलेक्स जेव्हा इमारतीच्या शिखरावर पोहोचले, तेव्हा त्यांनी हात उंचावून खाली जमा झालेल्या हजारो प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. त्यांच्या या जिद्दीचे आणि कौशल्याचे जगभरातून कौतुक होत आहे.
जुने रेकॉर्ड मोडीत
तैपेई 101 वर विनादोरी चढाई करून ॲलेक्स यांनी नवा इतिहास रचला आहे. यापूर्वी 2004 मध्ये फ्रान्सच्या एलेन रॉबर्ट यांनी या इमारतीवर चढाई केली होती, परंतु त्यांनी सुरक्षा दोरीचा वापर केला होता. ॲलेक्स यांनी यापूर्वी अमेरिकेतील योसेमिटी नॅशनल पार्कमधील 'एल कॅपिटन' या महाकाय खडकावरही विनादोरी चढाई करून जगाला थक्क केले होते, ज्याची पुनरावृत्ती त्यांनी आता तैवानमध्ये केली आहे.