Monday, October 14, 2024 12:41:00 AM

Onion Mahabank
राज्यात कांदा महाबँक सुरू करणार

कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत आहे.

राज्यात कांदा महाबँक सुरू करणार

मुंबई : कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत आहे. राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बॅंक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कांदा हे नाशवंत पीक आहे. अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर वीकिरण प्रक्रीया करून कांद्याची साठवणूक करता येईल. या कांदा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कांद्याची महाबॅंक ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून त्याची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होत आहे. या ठिकाणी हिंदुस्थान अॅग्रो संस्थेच्या माध्यमातून कांद्याची बॅंक सुरू होत आहे, असे मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले. 

कांद्याचे उत्पादन ज्या भागात जास्त प्रमाणात होते अशा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे वीकिरण प्रक्रीया केंद्र उभारुन कांद्याची महाबॅंक तातडीने सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गालगत सुमारे १० ठिकाणी कांद्याची बॅंक करण्याचे प्रस्तावित असून त्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रकल्प आहे. कांद्याच्या महाबॅंकेमुळे कांद्याची साठवणूक करणे शक्य होईल. कांद्याला चांगला भाव मिळाल्यावर तो शेतकऱ्यांना विकता  येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo