कसौली : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्लू स्टार (Operation Blue Star) या मोहिमेवर मोठे वक्तव्य केले आहे. 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लष्कर बुटांसह शिखांचे पवित्र धर्मस्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात शिरले, ज्यामुळे शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि पुढे इंदिरा गांधींची हत्या झाली. मात्र, हे ऑपरेशन राबवणे ही सुवर्ण मंदिराला अतिरेक्यांच्या ताब्यातून सोडवण्याची चुकीची पद्धत होती, असे चिदंबरम म्हणाले. ऑपरेशन ब्लू स्टार हा मार्ग चुकीचा होता, असे चिदंबरम स्पष्टपणे म्हणाले.
ऑपरेशन ब्लू स्टारची पद्धत चुकीची होती
पी. चिदंबरम यांनी पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या 'दे विल शूट यू मॅडम' या पुस्तकावर हिमाचल प्रदेशातील कसौली साहित्य महोत्सवात आयोजित केलेल्या चर्चेत हे विधान केले. "तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा जो निर्णय घेतला, त्याची पद्धत चुकीची होती. त्याची किंमत इंदिरा गांधींना त्यांचा जीव गमावून चुकवावी लागली," असे चिदंबरम म्हणाले. वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राहिलेल्या चिदंबरम यांचे हे वक्तव्य निश्चितपणे भूतकाळातील या महत्त्वाच्या घटनेविषयी मोठी टिप्पणी ठरते. पुढे चिदंबरम म्हणाले, "मला एकाही लष्करी अधिकाऱ्याचा अनादर करायचा नाही. मात्र, ऑपरेशन ब्लू स्टार ज्या प्रकारे राबवण्यात आले ते चुकीचे होते."
चिदंबरम यांच्या मते, या ऑपरेशननंतर काही वर्षांनी लष्कराने सुवर्ण मंदिर बायपास करून आणि ते सुरक्षित ठेवत मुक्त करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडला होता. "मला आजही हे मान्य आहे की, ऑपरेशन ब्लू स्टार ज्या पद्धतीने राबवलं गेलं, तो मार्ग चुकीचा होता," असे ते म्हणाले.
हेही वाचा - Cyclothon In Mumbai : NSG तर्फे मुंबईत सायक्लोथॉनचे आयोजन; 26/11 च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानाला आदरांजली
..पण ऑपरेशन ब्लू स्टार हा इंदिरा गांधींचा वैयक्तिक निर्णय नव्हता
चिदंबरम यांनी हेही स्पष्ट केले की, ऑपरेशन ब्लू स्टार हा केवळ इंदिरा गांधींचा वैयक्तिक निर्णय नव्हता. त्यामुळे याच्याशी संबंधित कोणत्याही घटनेसाठी त्यांना एकट्याला दोष देणे योग्य नाही. "ऑपरेशन ब्लू स्टार हा लष्कर, पोलीस, गुप्तचर विभाग या सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय होता. त्यामुळे या निर्णयासाठी फक्त इंदिरा गांधींना दोष देता येणार नाही," असे ते म्हणाले.
पंजाबमधील स्थिती : ते म्हणाले, पंजाबला त्यांनी अनेकदा भेटी दिल्या आहेत, त्यामुळे त्यांना असे वाटते की, फुटीरतावादी आणि खलिस्तानी लोकांची घोषणा आता विरून गेली आहे. आता या ठिकाणी मुख्य समस्या आर्थिक स्थिती आहे, असेही त्यांनी सांगितले.
काय होते ऑपरेशन ब्लू स्टार?
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला यंदा 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. खलिस्तान या वेगळ्या राष्ट्राची मागणी करणारे शीख अतिरेकी सुवर्ण मंदिरामध्ये तळ ठोकून बसले होते. या शीख अतिरेक्यांविरोधात कारवाई करणे अत्यंत आवश्यक होते. कारण, या अतिरक्यांमुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला होता. या ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई जून 1984 मध्ये सुरू करण्यात आली होती.
या ऑपरेशनदरम्यान शेकडो सामान्य नागरिकांचा तसेच 87 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. सुवर्ण मंदिर हे शिखांचे पवित्र धर्मस्थळ मानले जाते. या कारवाईमुळे या सुवर्ण मंदिराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, असा आरोप शिखांकडून केला जातो. या घटनेचे भारतीय राजकारणावर गंभीर परिणाम झाले.
हेही वाचा - Taliban Press Conference : तालिबानी परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्यातील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला; प्रियांका गांधींनी नोंदवला आक्षेप