मुंबई : राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर आणि अन्य तीर्थस्थळांच्या विकासासाठी सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पंढरपूरच्या दर्शन मंडप व दर्शन रांग यासाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांची कामे समाविष्ट आहेत.
मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले की, तीर्थस्थळांचा विकास दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावा, तसेच यासंबंधी तातडीने नियोजन केले जावे. याशिवाय, भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी त्यांच्या जीवनपटाची ओळख करून देणारे 'थीम पार्क' निर्माण केले जाणार आहे. या थीम पार्कसाठी दोन हेक्टर जागा उपलब्ध असेल आणि हे सावरकर यांच्या निवासस्थानाच्या जवळच असणार आहे.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार समाधान अवताडे, आमदार श्रीमती सरोज अहिरे, राज्याची मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.