Tuesday, January 21, 2025 03:28:24 AM

Parliament Winter Session
सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार अधिवेशनाचा समारोप शुक्रवार २० डिसेंबर २०२४ रोजी होईल.

सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार अधिवेशनाचा समारोप शुक्रवार २० डिसेंबर २०२४ रोजी होईल. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संसदेत १९ बैठका होतील. यंदाच्या अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयकासह एकूण १६ विधेयके संसदेत सादर करण्याचे नियोजन सरकारी पातळीवर झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन आहे. संविधान दिन असल्यामुळे २६ नोव्हेंबर रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होणार नाही. संसदेत संविधान दिनानमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय खासदार उपस्थित असतील. 

अमेरिकेतील एका न्यायालयात अदानी समुहाविरोधात एक याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणावरुन विरोधक संसदेत गदारोळ करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा तसेच अनेक राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठीच्या पोटनिवडणुकांचे निकाल शनिवार २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर होणार आहे. या निकालांचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. महागाई, जीएसटी, अत्यावश्यक वस्तूंचे दर या मुद्यांवरुनही संसदेत विरोधक गदारोळ करण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या नेतृत्वात निवडणुका लढवत असलेल्या पक्षांनी वक्फ बोर्डाचे प्रतिनिधी, मुसलमान धर्मगुरु यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना निवडक आश्वासने दिली तर पंतप्रधान मोदींनी 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' अशी घोषणा दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी 'बंटेंगे तो कटेंगे' अशी घोषणा दिली. प्रामुख्याने भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' आणि 'बंटेंगे तो कटेंगे' या दोन घोषणांचा वेगवेगळ्या मतदारसंघांचा अंदाज घेत सोयीनुसार पुनरुच्चार केला. या घडामोडींचेही पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनाआधी दिल्लीत भाजपाच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात रालोआची आणि काँग्रेसच्या नेतृत्वात इंडी आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकांमध्ये दोन्ही बाजूचे पक्ष हिवाळी अधिवेशनात काय बोलायचे - कसे बोलायचे... याबाबतचे नियोजन करणार आहेत. 


सम्बन्धित सामग्री