Cyber Scam : सध्या वाढत्या डिजिटलायझेशनच्या युगात सोशल मीडियावर सक्रिय राहणं सर्वांसाठी गरजेचं ठरत आहेत. मात्र, सायबर भामट्यांनीही सर्वांना हैराण केलं आहे. नोकरीच्या शोधात असलेले तरुण-तरुणी आता सायबर चोरट्यांचं नवं लक्ष्य ठरत आहेत. इन्स्टाग्राम आणि लिंक्डइनवर पार्ट टाइम जॉबच्या ऑफर देऊन बँक खाती रिकामी केली जात आहेत. सायबर चोरट्यांनी फसवणुकीची ही नवी पद्धत शोधली आहे. लिंक्ड इन, इन्स्टाग्रामवर नोकरीचा शोध घेणारे अनेक तरुण-तरुणी या जाळ्यात फसत आहेत. तुम्ही अशा मेसेजला बळी पडू नये, यासाठी सावध राहणे आवश्यक बनले आहे.
असं पसरवलं जातं फसवणुकीचं जाळं
सायबर गुन्हेगार सोशल मीडियावरून तरुणांना शोधतात. जे तरुण नोकरीच्या पोस्ट लाईक करतात, त्यांना टार्गेट केले जाते. चोरटे सुरुवातीला खूप प्रोफेशनल असल्याचे भासवतात. ते विना मुलाखत निवड आणि चांगल्या पगाराचे आमिष दाखवतात. तातडीने जॉईन करण्याविषयी बोलणी करू शकतात. यासाठीच किंवा इतर काहीतरी कारण सांगून ते तुमची वैयक्तिक माहिती मागवून घेतात. नोकरी निश्चित करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास माहितीचा चुकीचा वापर करण्याची धमकी दिली जाते.
बनावट ऑफर लेटर कसे ओळखावे?
बनावट ऑफर लेटरमध्ये अनेक चुका असतात. त्यात कंपनीचा अधिकृत ईमेल आयडी नसतो. कंपनीचा पत्ता आणि लोगो चुकीचा असू शकतो. पगार आणि कामाच्या स्वरूपाबद्दल स्पष्टता नसते. भाषेमध्ये व्याकरणाच्या अनेक चुका दिसून येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणतीही खरी कंपनी नोकरी देण्यासाठी पैशांची मागणी करत नाही. जर कोणी फी किंवा ट्रेनिंगसाठी पैसे मागत असेल, तर ती फसवणूक आहे.
स्कॅमर्सचे सॉफ्ट टार्गेट कोण?
सायबर चोरटे प्रामुख्याने विद्यार्थी आणि फ्रेशर्सना लक्ष्य करतात. ज्यांना पैशांची तातडीची गरज आहे, असे लोक लवकर जाळ्यात अडकतात. कमी पगार असलेल्या नोकरीमुळे त्रस्त असणारे लोकही चोरट्यांच्या निशाण्यावर असतात. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर अशा ऑफर्सचा सुळसुळाट झाला आहे. लिंक्डइनवरही आता बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांना फसविले जात आहे.
हेही वाचा - SC Warning to WhatsApp: व्हॉट्सॲपचा डेटा शेअरिंगचा अट्टाहास म्हणजे खासगी माहितीची चोरीच; सर्वोच्च न्यायालयाचा मेटाला कडक इशारा
फसवणूक झाल्यास काय करावे?
अशी घटना घडल्यास वेळ न घालवता तक्रार करा. नॅशनल सायबर क्राईम पोर्टल cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार नोंदवा. सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर तात्काळ कॉल करा. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन माहिती द्या. तुमच्या बँकिंग डिटेल्सची सुरक्षा तपासा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा. सतर्क राहणे हाच सायबर चोरीपासून वाचण्याचा उत्तम मार्ग आहे.
सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी खालील 10 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा:
- अधिकृत वेबसाईटचा वापर: इंटर्नशिप किंवा नोकरीसाठी नेहमी संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच अर्ज करा.
- पैसे देणे टाळा: कोणत्याही अनोळखी एजंट किंवा कन्सल्टन्सीला नोकरीच्या बदल्यात ऑनलाइन पैसे देऊ नका.
- ईमेलची खात्री करा: केवळ कंपनीच्या अधिकृत ईमेल पत्त्यावरून आलेल्या पत्रांवर किंवा लिंकवरच क्लिक करा.
- ऑफर लेटरची पडताळणी: कोणतेही ऑफर लेटर स्वीकारण्यापूर्वी त्याची सत्यता नीट तपासून पाहा.
- मुलाखतीशिवाय निवड: जर कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत न घेता तुम्हाला थेट नोकरीची ऑफर येत असेल, तर ती बनावट असू शकते.
- पेमेंटची मागणी: नोकरी देण्यापूर्वी जर कोणी पैशांची मागणी केली, तर तो स्पष्टपणे फसवणुकीचा प्रकार आहे.
- UPI लिंकपासून सावध: कोणतीही नामांकित कंपनी व्हॉट्सॲप, ईमेल किंवा SMS द्वारे UPI लिंक पाठवून पैसे मागत नाही.
- गोपनीयता पाळा: सोशल मीडिया पेजवर आपली वैयक्तिक माहिती किंवा बँकिंग डिटेल्स कधीही शेअर करू नका.
- तक्रार नोंदवा: बनावट कागदपत्रे किंवा संशयास्पद ऑफर मिळाल्यास तात्काळ सायबर सेलकडे तक्रार करा.
- अनोळखी कॉल्सवर विश्वास ठेवू नका: कोणत्याही संशयास्पद मेल, लिंक किंवा अनोळखी फोन कॉलवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
हेही वाचा - What's App Fraud : व्हॉट्सॲपवर 'चालान'चा मेसेज आला.. क्लिक करताच 4 लाख उडाले; सायबर भामट्यांची नवी शक्कल!