छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वाळूज औद्योगिक परिसरात साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य विभाग आणि खाजगी रुग्णालयातून उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये जुलाब, हिवताप आदी साथीच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बजाजनगर आरोग्य विभागाच्या आणि खाजगी डॉक्टरांच्या आकडेवारीनुसार औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी, बजाजनगर येथील साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये साथीच्या आजारांचे ३९५ रुग्ण सापडले असून, त्यामध्ये गॅस्ट्रोचे सर्वाधिक १०९ तर त्याखालोखाल हिवतापाचे ९७ रुग्ण सापडले आहेत. त्याशिवाय त्रिमूर्ती चौकात एक तर दुसरा सिडको वाळूज महानगर परिसरात एक असे डेंग्यूचे २ रुग्ण आढळून आले. जून महिन्यात आढळून आलेल्या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात वेळीच उपचार केल्याने दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. परम वाकदकर यांनी दिली. गॅस्ट्रो, हिवताप याशिवाय इतरही साथीच्या आजाराने रुग्ण ग्रस्त झाले आहेत.