नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि 'जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी'ने आयोजित केलेला "गाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची" हा विशेष कार्यक्रम विदर्भाच्या समृद्ध इतिहासाचा गौरव करणारा ठरला.
कार्यक्रमात विदर्भाच्या विकासाच्या दिशेने विविध उपक्रमांची माहिती जनतेसमोर मांडण्यात आली. विदर्भाचा इतिहास पुराणकाळातही सापडतो, ज्यात महाभारतातील पांडवांचा अज्ञातवासही विदर्भात झाल्याचा उल्लेख आहे. या कार्यक्रमाचा उद्देश विदर्भाला समृद्धीच्या मार्गाने भारताच्या विकसनशील आलेखात स्थान मिळवून देण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेसमोर याबाबतची माहिती पुरवणे होता.
'थेट, अचूक, बिनधास्त' या घोषवाक्यासह गेली अकरा वर्ष बातमीदारी करणाऱ्या 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने आयोजित केलेले चर्चासत्र महत्त्वाचे ठरले. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचारमंथन झाले.
विशेष पाहुणे म्हणून कपिल चंद्रयान, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार, अभिनेता भारत गणेशपुरे, सेलिब्रेटी शेफ विष्णू मनोहर, अभिनेता शिव ठाकरे, महेश मोरोणे (डेप्युटी जनरल मॅनेजर मेट्रो), दीपेन अग्रवाल (अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेड), वीरेंद्र खरे (आर्किटेक), नरेश बोरकर (सुप्रिटेंडन्ट इंजिनियर, नागपूर मेट्रो) आणि परिणय फुके (आमदार, भाजप) उपस्थित होते.
गाथा विदर्भाची या कार्यक्रमात बोलताना सुप्रिटेंडेंट इंजिनीयर नरेश बोरकर म्हणाले, रस्ते आणि महामार्गाचे प्रकल्प करताना आव्हाने बरीच असतात आणि त्याला कायद्याच्या चौकटीत बसवून करून घेणे हे एक कौशल्य आहे. हा संपूर्ण प्रकल्प ग्रीन फील्ड प्रकल्प आहे. रस्त्यांना वाहनांना जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा नसावा या दृष्टीने हा प्रकल्प करण्यात आला. या प्रकल्पासाठी जागेचं मोठं आव्हान होतं असे बोरकर यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, विदर्भात समृद्धी महामार्ग तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. आपण विचार करू शकणार नाही एवढ्या लवकर हा रस्ता तयार करण्यात आला आहे.भूमी अधिग्रहन म्हटले कि सर्वात आधी लोकांचा विरोध असतो. पण समृद्धी महामार्गावेळी लोकांचा फार विरोध नव्हता. लोकांना योग्य मोबदला मिळाल्याने लोकांचे सहकार्य मिळाले.
हा कार्यक्रम विदर्भाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजना, प्रकल्प, आणि धोरणांची माहिती देण्यात महत्त्वपूर्ण ठरला. 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीने राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेला योग्य माहिती पुरवण्याचा सकारात्मक प्रयत्न केला, ज्यामुळे विदर्भाला भारताच्या विकसनशील आलेखात स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक योगदान दिले जाईल.
या चर्चासत्राने विदर्भाच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी उचलली आहे, ज्यामुळे या प्रदेशातील जनतेमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. "गाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची" कार्यक्रम विदर्भाच्या इतिहास, संस्कृती आणि भविष्याच्या विकासाची जाणीव करून देणारा ठरला आहे.