Punjab National Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँकेने (PNB) नोकरीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पीएनबीने 2026 सालासाठी 'शिकाऊ उमेदवार' (Apprentice) पदांच्या तब्बल 5,138 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, ज्या उमेदवारांच्या पदवीचा निकाल 31 डिसेंबर 2025 पूर्वी लागलेला आहे, तेच या भरतीसाठी पात्र ठरतील. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
राज्यानुसार जागा आणि विद्यावेतन (Stipend)
एकूण 5,138 जागांपैकी महाराष्ट्र राज्यासाठी 232 जागा राखीव आहेत. ही भरती 'शिकाऊ उमेदवार' (Apprentice) म्हणून 1 वर्षाच्या प्रशिक्षणासाठी आहे. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा विद्यावेतन दिले जाईल:
ग्रामीण/निमशहरी/शहरी शाखा: 12,300 रुपये प्रति महिना.
मेट्रो शहरे: 15,000 रुपये प्रति महिना.
हेही वाचा - Professor Recruitment : तरुणांसाठी आनंदाची बातमी, प्राध्यापक भरतीसाठी 60:20:20 चा नवा फॉर्म्युला लागू; आता वशिलेबाजीला बसणार लगाम
अर्ज शुल्क आणि श्रेणीनिहाय तपशील
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागेल:
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस (पुरुष): 944 रुपये (GST सह).
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस (महिला): 708 रुपये (GST सह).
एससी/एसटी/दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर: 236 रुपये (GST सह).
अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांना 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्जासाठी pnb.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 'Career' सेक्शनमध्ये नोंदणी करावी लागेल. अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे. या भरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा मार्च 2026 च्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Job Recruitment : नोकरीची सुवर्णसंधी! हजारो कामगारांची गरज; तब्बल 50 हजार ते 1 लाखापर्यंत पगार आणि इतर सवलतीही, कुठे? जाणून घ्या