सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य व केंद्र सरकारवर कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. “कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीवर प्रश्नचिन्ह
प्रणिती शिंदे म्हणाल्या, "महाराष्ट्र हा एकेकाळी पुरोगामी विचारांचा गड मानला जात होता. महिलांना संघर्षातून पुढे येण्यासाठी प्रेरित करणारे वातावरण इथे होते. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. महिलांवरील अत्याचार आणि अन्याय वाढले आहेत. दिन-दलित आणि अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत."
सरपंचांच्या हत्या आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न
भाजपाच्या सत्ताकाळात कायदा व सुव्यवस्थेची पूर्णपणे वाट लागली असल्याचा आरोप त्यांनी केला. "बीड, परभणी, बदलापूर अशा ठिकाणी दिवसाढवळ्या सरपंचांचे खून होतात, परंतु कोणतीही ठोस कारवाई होत नाही. मुख्यमंत्री खोट्या कारणांचा आधार घेऊन गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत," असे त्यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा
खासदार शिंदे यांनी संसदेत सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. "सावित्रीबाई यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू," असे त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा आरोप
“आज गुन्हेगार जेलमध्ये बसून मुलाखती देत आहेत. त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातोय. पोलिसांवर दबाव टाकून चुकीचे एफआयआर नोंदवले जात आहेत. सामान्य माणूस कुठे न्याय मागणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी
“धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घ्यावा. दोषी असो वा नसो, नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देणे गरजेचे आहे,” असे खासदार शिंदे यांनी मत व्यक्त केले.
“सोलापूरचे नेतृत्व आज अकार्यक्षम ठरले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात सोलापूरला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते. आज मात्र आमदार असूनही मंत्रिपद मिळत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘लाडकी बहीण’ योजनेवर सडकून टीका
खासदार शिंदे म्हणाल्या, "लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीचा जुमला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. इतर योजनांचेही पैसे थांबवले गेले आहेत."
खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध मुद्द्यांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे पुनरुज्जीवन करण्याची गरज व्यक्त केली आणि राज्य सरकारला जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला.
हे देखील वाचा : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक: प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण