पंढरपूर : कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडूचा प्रसाद तयार करण्यात येत असून आठ लाख लाडू बनविण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल, या दृष्टीने ८ लाख बुंदी लाडू प्रसाद व ५० हजार राजगिरा लाडू प्रसाद तयार करण्यात येत आहे. ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकीट २० रुपये प्रमाणे व दोन राजगिरा लाडू १० रुपयेप्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी एकूण तीन स्टॉल असून, सर्व स्टॉल २४ तास खुले ठेवण्यात येत आहेत.