मुंबई : मुंबई-पुणे जोडणीचा महत्त्वाचा धागा असलेल्या पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली.
या चर्चेत प्रकल्पातील राज्याचा वाटा आणि संबंधित मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी सकारात्मकता दर्शवली आहे, ज्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामांचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे मार्गावरचा वाहतूक ताण कमी होईल आणि प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाची सुविधा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.