Wednesday, February 18, 2026 06:19:59 PM

Pune Mumbai Road Traffic : प्रवाशांनो लक्ष द्या! पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या ST च्या सर्व फेऱ्या रद्द; एक्सप्रेस-वेवर अपघातानंतर 22 तासांनंतरही कोंडी कायम!

अपघातानंतर गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असले तरी, वाहनांच्या रांगा आता 50 किलोमीटरपर्यंत पोहोचल्यात. यात STच्या बसेसही अडकल्या असल्याने आणखी बसेस न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

pune mumbai road traffic  प्रवाशांनो लक्ष द्या पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या st च्या सर्व फेऱ्या रद्द एक्सप्रेस-वेवर अपघातानंतर 22 तासांनंतरही कोंडी कायम

Pune Mumbai Road Traffic New Update : पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या गॅस टँकर अपघाताने प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहिला आहे. तब्बल 22 तास उलटूनही वाहतूक कोंडी सुटलेली नाही. प्रोपिलिन गॅसच्या गळतीमुळे सुरक्षिततेसाठी महामार्ग बंद ठेवण्यात आला असून, याचा थेट परिणाम राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीवर झाला आहे.

एसटी प्रशासनाचा मोठा निर्णय: 'या' फेऱ्या रद्द
वाहतूक कोंडी इतकी भीषण आहे की, एसटी महामंडळाने पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आपल्या सर्व महत्त्वाच्या फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे आणि बोरीवलीकडे जाणाऱ्या बसेसचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, यात 73 ई-शिवनेरी आणि 66 इतर बसेसचा समावेश आहे. एक्सप्रेस-वेवर एसटीच्या सुमारे 163 बसेस अजूनही अडकून पडल्या आहेत. जोपर्यंत रस्ता पूर्णपणे मोकळा होत नाही, तोपर्यंत नवीन बसेस न सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा - Mumbai Pune Expressway Traffic Jam : भीषण अपघातानंतर गॅस गळतीमुळे महामार्ग ठप्प; रुग्ण आणि प्रवाशांचे अतोनात हाल, विमानेही चुकली!

50 किमीच्या रांगा आणि प्रवाशांचे अन्न-पाण्याविना हाल
अपघातानंतर गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असले तरी, वाहनांच्या रांगा आता 50 किलोमीटरपर्यंत पोहोचल्या आहेत. अनेक प्रवासी मागील 21 तासांपासून रस्त्यावरच अडकले आहेत. कडक उन्हात पाण्यासाठी आणि अन्नासाठी लहान मुले, वृद्ध आणि आजारी प्रवाशांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. महामार्गावर सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. मात्र, या कठीण काळात स्थानिक स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेत हजारो पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून प्रवाशांना माणुसकीचा आधार दिला आहे.

कधी होणार वाहतूक सुरळीत?
अपघातग्रस्त टँकरमधील गॅस जोपर्यंत दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे हलवला जात नाही, तोपर्यंत तो टँकर तिथून हटवणे धोक्याचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रस्ता मोकळा केला जाईल. महामार्ग पोलिसांनी प्रवाशांना एक्सप्रेस-वेवरून प्रवास टाळण्याचे आणि शक्य असल्यास ताम्हिणी घाट किंवा माळशेज घाट या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रवासासाठी सोबत पुरेसे अन्न आणि पाणी ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - Mumbai Belasis Flyover: विक्रमी वेळेत काम पूर्ण करूनही मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल का आहे बंद? धक्कादायक कारण समोर


सम्बन्धित सामग्री