मुंबई : रेल्वे प्रशासनाने २६ मे रोजी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेतला आहे. रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तीन रेल्वे मार्गांवर घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्याआधी थोडा विचार करून घराबाहेर पडणे फायद्याचे ठरणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर माटूंगा ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकातून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी स्थानकाकडे येणाऱ्या सर्व अप डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन सकाळी ११.१० ते ४.४० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक धीम्या मार्गावर असल्याने सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत जाणाऱ्या सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.