मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे. राज कुंद्राला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. 2 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता ईडी कार्यालयात पोहचण्याचे आदेश देण्यात आले आहे. पॉर्नग्राफीप्रकरणी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडून चौकशी होणार असून अभिनेत्री गहेना वशिष्ठलाही ईडीकडून समन्स जारी करण्यात आला आहे.
ईडीने मुंबई आणि उत्तर प्रदेशातील कुंद्रा आणि इतर काही व्यक्तींच्या घरे आणि कार्यालयांसह सुमारे 15 ठिकाणी छापे टाकल्यानंतर हे समन्स जारी करण्यात आला. याप्रकरणात सामिल असलेल्या इतर लोकांना देखील ईडीने समन्स जारी करत चौकशीसाठी मुंबई कार्यालयात बोलावलं आहे. राज कुंद्रा याला सोमवारी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
काय म्हणाले राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील?
‘माझ्या क्लायंटची काही चूक नाही. मी अद्याप माझ्या क्लायंटसोबत चर्चा केलेली नाही. पण मी तुम्हाला सांगू शकतो माझ्या क्लायंटची चुकी नाही. मुंबई पोलिसांच्या चार्जशी पाहिली तर राज कुंद्राचे व्यवहार कायदेशीर आहेत. त्याने कर भरला आहे. मी खात्रीने सांगू शकतो की राज कुंद्राने मनी लाँड्रिंगसारखा कोणताही गुन्हा केलेला नाही. ‘
काय म्हणाला होता राज कुंद्रा?
राज कुंद्रा याने 2021 मध्ये मुंबईतील स्थानिक न्यायालयात सांगितलं होतं की, ‘पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये वापरण्यात आलेल्या ‘हॉटशॉट्स’ ॲपला कायद्यानुसार कोणत्याही गुन्ह्याशी जोडण्यासाठी मुंबई पोलिसांकडे माझ्या विरोधात पुरावे नाहीत.’ असं राज कुंद्रा म्हणाला होता.
दरम्यान ईडीने पॉर्नोग्राफी आणि अश्लील सिनेमांचं प्रसारण संबंधी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा याला समन्स जारी केला असून 2 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता ईडी कार्यालयात हाजीर होण्याचे आदेश देण्यात आले आहे.