Rajasthan Royals New Captain: इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामासाठी (IPL 2026) राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात क्रांतिकारी बदल केले आहेत. गेल्या अनेक हंगामांपासून संघाचे नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनला ट्रेड विंडोद्वारे चेन्नई सुपर किंग्जकडे सोपवल्यानंतर, राजस्थानचा नवा कर्णधार कोण असेल, याबाबत क्रिकेट वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अनुभवी रवींद्र जडेजा हे पद स्वीकारेल अशा चर्चांना पूर्णविराम देत, फ्रँचायझीने युवा फलंदाज रियान पराग याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
संजू सॅमसनची एक्झिट आणि नेतृत्वाचा पेच
IPL 2026 च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला मुक्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तेव्हापासून चाहत्यांच्या नजरा नवीन कर्णधारावर खिळल्या होत्या. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सचा भाग असल्याने त्याच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, भविष्याचा विचार करून संघ व्यवस्थापनाने 24 वर्षीय रियान परागवर विश्वास दाखवला आहे. पराग गेल्या 7 हंगामांपासून या फ्रँचायझीशी जोडलेला असून त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
गेल्या हंगामातील कठीण काळ आणि परागचा अनुभव
IPL 2025 चा हंगाम राजस्थान रॉयल्ससाठी आव्हानात्मक ठरला होता. संजू सॅमसन दुखापतीमुळे 8 सामने खेळू शकला नव्हता, तेव्हा रियान परागनेच तात्पुरती धुरा सांभाळली होती. जरी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने केवळ 2 सामने जिंकले आणि 6 सामने गमावले, तरीही फलंदाज म्हणून परागने छाप पाडली. त्या 8 सामन्यांमध्ये त्याने 38.57 च्या सरासरीने धावा केल्या, ज्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या 95 धावांच्या खेळीचा समावेश होता, जी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
हेही वाचा - T20 World Cup 2026: झिम्बाब्वेची तुफान खेळी, टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव; 18 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या
रियान परागची आकडेवारी, 7 हंगामांचा प्रवास
रियान परागने 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याची सर्वात प्रभावी कामगिरी 2024 च्या हंगामात पाहायला मिळाली, जिथे त्याने 52.09 च्या सरासरीने 573 धावा कुटल्या होत्या. आतापर्यंतच्या कारकिर्दीत परागने एकूण 84 सामने खेळले असून, 26.1 च्या सरासरीने 1566 धावा केल्या आहेत. फलंदाजीसोबतच त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने 7 बळीही मिळवले आहेत. आता कर्णधार म्हणून तो राजस्थान रॉयल्सला नवीन उंचीवर नेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.