Sunday, March 08, 2026 01:28:19 PM

Ramdas Kadam : "यंत्रणा चालवता येत नसेल तर..," ईव्हीएम बिघाडावरून रामदास कदम संतप्त; निवडणूक आयोगावर डागली तोफ

मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर खेड तालुक्यातील अनेक केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. यामुळे रामदास कदम यांच्या बंधूंनाही अर्धा तास वाट पाहावी लागली.

ramdas kadam  quotयंत्रणा चालवता येत नसेल तरquot ईव्हीएम बिघाडावरून रामदास कदम संतप्त निवडणूक आयोगावर डागली तोफ

Ramdas Kadam on EVM Machine Failure : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, ईव्हीएम (EVM) मशीन बंद पडण्याच्या प्रकारावरून शिवसेना नेते रामदास कदम यांचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात मतदानादरम्यान अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले. या अनागोंदी कारभारामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी थेट निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता जपण्यासाठी यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

मशीन बंद अन् मतदारांचे हाल; कदम संतापले
मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर खेड तालुक्यातील अनेक केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम, जे स्वतः उमेदवार आहेत, त्यांनाही मतदानासाठी सुमारे 30 मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले. काही गावांमध्ये तर सकाळपासून मशीन बंद असल्याने मतदानाला सुरुवातच झाली नव्हती. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताची किंमत अमूल्य आहे, पण प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लोकशाहीचा हा उत्सव काळवंडत आहे," अशा शब्दांत कदम यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदारांचा वेळ आणि लोकशाहीचा सन्मान राखण्यासाठी किमान मशीन बंद पडणार नाहीत, याची तरी दक्षता घ्या, असे त्यांनी प्रशासनाला सुनावले.

हेही वाचा - Zilla Parishad Election 2026 : मतदान केंद्रात लहान मुलांना प्रवेश; काय म्हणाले जिल्हाधिकारी, वाचा सविस्तर

सत्ता आमची असली तरी नियोजन हवेच!
रामदास कदम यांनी केवळ आयोगालाच नाही तर अप्रत्यक्षपणे प्रशासकीय यंत्रणेलाही इशारा दिला. "सत्ता आमची आहे, सरकार आमचे आहे, पण कामात नियोजन आवश्यक आहे," असे म्हणत त्यांनी कळवंडे गावातील मशीन बंद असलेल्या घटनेचा दाखला दिला. सकाळी 7:00 वाजल्यापासून मतदार रांगेत असूनही जर यंत्रे चालत नसतील, तर जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाने नेमकं काय काम केलंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या गंभीर प्रकरणाबाबत ते निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

EVM वारंवार बंद पडत असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी
ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करत कदम यांनी एक धाडसी विधान केले. ते म्हणाले की, जर तुम्हाला ही यंत्रे नीट राबवता येत नसतील आणि लोकांना 2 ते 3 तास उन्हात उभे राहावे लागत असेल, तर ईव्हीएम बंद करून पुन्हा जुनी 'शिक्का मारण्याची' बॅलेट पेपर पद्धत सुरू करा. यामुळे मशीन मॅनेज केल्याचा लोकांच्या मनातील संशयही दूर होईल. पराभूत उमेदवार अनेकदा ईव्हीएमवर खापर फोडतात, तो विषयच यामुळे कायमचा संपून जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, ईव्हीएम बंद पडण्याच्या प्रकारामुळे खेड परिसरातील मतदारांमध्येही संतापाचे वातावरण असून, मतदानाच्या टक्क्यावर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता यावर निवडणूक आयोग काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Sangli ZP Election: 'जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसेल...'; विशाल पाटील यांचा दावा


सम्बन्धित सामग्री