मुंबई : महायुतीच्या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारतील असे संकेत रावसाहेब दानवे यांनी दिले. भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री पदाविषयी बोलताना त्यांनी अनेक संकेत दिले. दानवे यांनी सध्या विरोधकांकडून सुरू असलेल्या ईव्हिएमबाबतच्या आरोपांनाही थेट प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होईल, अशी ग्वाही भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी दिली. पण मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व कोण करणार ? याबाबत स्पष्ट उत्तर देणे दानवेंनी टाळले. मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल. हा निर्णय घेणाऱ्यांमध्ये मी नाही. जे या प्रक्रियेत आहेत ते लवकरच निर्णय जाहीर करतील असे दानवे म्हणाले. पण देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत अशी पुस्ती जोडत त्यांनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असतील असे संकेत दिले. यामुळे राज्याचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जुनी आहे. पण फडणवीस मुख्यमंत्री असताना या मुद्याने नव्याने उचल खाल्ली. पुढे फडणवीस उपमुख्यमंत्री होते त्यावेळीही मराठा आरक्षणावरुन आंदोलन सुरू होते. यामुळे राज्यात मराठा समाजाचा नेता मुख्यमंत्री केला जाणार की मराठा समाजाचा नसलेला नेता मुख्यमंत्री होणार यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि नंतर ते उपमुख्यमंत्री असतानाही या विषयात तत्कालीन राज्य शासनांनी बरंच काम केलं. राज्यात महायुती सरकार असताना मराठा समाजाला मागास ठरवून शैक्षणिक क्षेत्रात तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय झाला. यामुळे मराठा समाजाचे प्रश्न तसेच राज्याशी संबंधित इतर प्रश्न हाताळण्याची संधी मराठा नेत्याला दिली जाणार की फडणवीसांना ही संधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना दानवेंनी दिलेल्या उत्तरामुळे महायुतीतल्या मुख्यमंत्री या पदाविषयीचा सस्पेन्स कायम आहे.
ईव्हीएम ही यंत्रणा काँग्रेस केंद्रात आणि अनेक राज्यात सत्तेत असताना देशात आणली गेली. जेव्हा निवडणुकीत विजय झाला त्यावेळी ईव्हीएमबाबत संशय घेतला जात नाही. पण निवडणुकीत पराभव झाला तर ईव्हीएमबाबत संशय का घेतला जातो ? देशात ईव्हीएम असताना भाजपाचा काही निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. पण भाजपाने कधीही तक्रार केली नाही; असेही रावसाहेब दानवे म्हणाले. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार ? मंत्रिमंडळात किती महिला असणार ? या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. गुणवत्तेच्या आधारे निर्णय होईल; असेही रावसाहेब दानवे म्हणाले.