Ratnagiri MIDC Sports Complex : रत्नागिरीतील खेळाडूंसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. गेल्या 15 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले रत्नागिरी एमआयडीसी (MIDC) परिसरातील जिल्हा क्रीडा संकुलाचे काम आता खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे 23 कोटी रुपये खर्चून उभारले जाणारे हे संकुल जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी उंची मिळवून देणार आहे.
निधीचा अडथळा दूर आणि कामाला गती
या क्रीडा संकुलाचे काम प्रत्यक्षात 15 वर्षांपूर्वी सुरू झाले होते, मात्र तांत्रिक अडचणी आणि निधीच्या कमतरतेमुळे हे काम रखडले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या प्रकल्पासाठी 29 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 7 कोटी रुपये मारुती मंदिर येथील संकुलासाठी वापरले गेले, तर उर्वरित 23 कोटी रुपये आता एमआयडीसीतील 11.50 एकर जागेत उभारल्या जाणाऱ्या या मुख्य संकुलासाठी खर्च केले जात आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते.
हेही वाचा - India Vs Pakistan Match: भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट; पावसाने खेळ बिघडवला तर काय? 5 की 10 षटके... जाणून घ्या डकवर्थ-लुईसचा नवा नियम
भव्य इनडोअर स्टेडियम आणि आधुनिक सुविधा
या संकुलाचे मुख्य आकर्षण म्हणजे 57 बाय 32 मीटर आकाराचे भव्य इनडोअर क्रीडांगण (Indoor Stadium) असणार आहे. या अत्याधुनिक क्रीडांगणासाठी 3.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. येथे बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस यांसारख्या विविध खेळांच्या जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याव्यतिरिक्त, मैदानी खेळांसाठीही सुसज्ज मैदाने आणि धावपट्टी (Track) विकसित करण्यात येत आहे.
खेळाडू आणि शिक्षकांसाठी 500 बेडचे वसतिगृह
रत्नागिरीत क्रीडा स्पर्धांसाठी येणाऱ्या खेळाडू आणि शिक्षकांसाठी निवासाची मोठी समस्या होती. ही अडचण दूर करण्यासाठी संकुल परिसरात 100 खोल्यांचे आणि 500 बेडचे भव्य वसतिगृह उभारले जाणार आहे. हे काम आगामी 2 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या या संकुलाच्या जागेचा वापर पोलीस भरती प्रक्रियेसाठीही केला जात आहे, ज्यावरून या जागेची भव्यता स्पष्ट होते. पायाभूत सुविधा आणि सुशोभीकरणाचे काम आता वेगाने पूर्णत्वास जात आहे.
जिल्ह्यातील प्रतिभेला मिळणार हक्काचे व्यासपीठ
हे संकुल पूर्ण झाल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना सराव करण्यासाठी एक हक्काचे आणि आधुनिक व्यासपीठ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन रत्नागिरीत करणे सुलभ होईल. खेळाडूंची प्रदीर्घ प्रतीक्षा संपल्याने क्रीडा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. येत्या काही महिन्यांत हे संकुल लोकार्पण करण्यासाठी सज्ज होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा - Sanjay Raut: 'हा सामना म्हणजे भाजपचा खेळ अन् सेटिंग...' भारत-पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांची बोचरी टीका