Red Fort blast: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या जवळ सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर राजधानीत घबराट पसरली आहे. कारमध्ये झालेल्या या विस्फोटानंतर काही सेकंदांत परिसर काळवंडला, धुराचे लोळ हवेत गेले आणि रस्त्यावर काचांचे तुकडे विखुरले. पण सर्वात जास्त धक्कादायक म्हणजे प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यांसमोर घडलेला हा थरार. अनेकांनी सांगितलं की आयुष्यात असा आवाज त्यांनी कधी ऐकला नव्हता.
जवळच्या स्टेशनरी दुकानात बसलेले एक दुकानदार म्हणाले “आम्ही सामान्यपणे बसून होतो. अचानक एवढा मोठा आवाज झाला की आम्ही खुर्चीतून खाली पडलो. पहिल्या सेकंदाला काय झालं हेच समजलं नाही. काचांचे तुकडे समोरून उडताना दिसले तेव्हा कळलं की मोठा ब्लास्ट झाला आहे.”
हेही वाचा: Breaking News: दिल्लीत हाय अलर्ट जारी! लाल किल्ल्याजवळ कारचा मोठा स्फोट; संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण
याच परिसरात राहणाऱ्या एका रहिवाशाने सांगितलं “मी छतावर होतो. अचानक आग आकाशात झेपावली. काळा धूर इतका दाट होता की रस्ते काही सेकंद दिसेनासे झाले.”
काही तरुणांनी सांगितलं की स्फोटानंतर सलग काही गाड्यांचे अलार्म वाजू लागले. आवाज इतका जास्त होता की आसपासचे मुले ओरडत पळू लागली. काही स्थानिकांनी हेही सांगितलं की स्फोटापूर्वी कारच्या आसपास जळण्याचा हलका वास आल्याचं त्यांना जाणवलं होतं.
घटनेनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. पुणे, मुंबई आणि इतर महत्वाच्या शहरी भागांमध्ये सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. स्फोटाचे अचूक स्वरूप, वापरलेली सामग्री आणि हेतू काय होता हे निष्पन्न करण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीम दाखल झाली असून जळालेल्या वाहनांचे सॅम्पल, धातूचे अवशेष आणि इतर पुरावे गोळा करून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्लू मिळवण्याचे काम सुरू आहे.