बुलढाणा : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याच्या नादात शेगाव तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आळसणा येथील चारमोरी पुलावर रील काढताना धावत्या रेल्वेची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचं नाव शेख नदीम शेख रफीक (वय 22) असं आहे, तर जखमी तरुणाचं नाव सय्यद शाकीर सय्यद नासीर (वय 28) असं आहे. दोघेही खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजाचे येथे राहतात. आळसणा येथे लग्नासाठी ते गेले होते. समारंभानंतर त्यांनी गावाजवळील नागपूर–मुंबई रेल्वेमार्गावरील चारमोरी पुलावर रील शूट करण्याचं ठरवलं.
ट्रॅकवर उभे राहून व्हिडिओ काढताना दोघांना रेल्वे गाडी किती जवळ आली आहे, याचा अंदाजच आला नाही. दोघांच्या कानात हेडफोन असल्याने रेल्वेचा हॉर्नही ऐकू आला नाही. काही क्षणांतच धावत्या गाडीने त्यांना धडक दिली. यात शेख नदीम याचा जागीच मृत्यू झाला, तर सय्यद शाकीर याने जीव वाचवण्यासाठी पुलावरून उडी घेतली. मात्र त्या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाला.
हेही वाचा: Maharashtra Police Recruitment: राज्यात पोलीस भरतीची मोठी संधी; 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार
घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला आहे. तर जखमी सय्यद शाकीर याच्यावर शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, तरुणांमध्ये सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालण्याची प्रवृत्ती किती घातक ठरू शकते, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी युवकांना आवाहन केलं आहे की, “लाईक्स” आणि “फॉलोअर्स”साठी स्वतःच जीवन धोक्यात घालू नका कारण एका क्षणाची बेपर्वाई संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
हेही वाचा: Mumbai Hostage Case: मुंबईतील आर. ए. स्टुडिओमधील धक्कादायक प्रकार, ओलीस धरलेल्या त्या मुलीने काय सांगितलं?