मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार न देता पाडापाडी करणार असल्याची घोषणा केली आहे. आमचा त्यांना सवाल आहे की ते दाऊदशी संबंधित असलेल्या पक्षाचे उमेदवार पाडणार आहेत की त्यांना जिंकवणार आहेत? असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मनोज जरांगे यांना केला आहे.
मनोज जरांगे यांनी काल उमेदवार जाहीर करणार नसल्याचे सांगितले होते. पण पाडापाडी करणार असेही त्यांनी जाहीर केले होते. मतदानाला गुपचूप जायचं आणि गुपचूप पाडायचं असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले होते. जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित झाल्या आहेत. पण कोणत्या पक्षाचे उमेदवार ते पाडणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी ट्विट करत त्यांना दाऊदशी संबंधित पक्षाचे उमेदवार पाडणार की त्यांना जिंकणार ? असा सवाल केला आहे.
या ट्विट मध्ये त्यांनी कुठल्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे मुख्यमंत्री असताना दुबई विमानतळावर दाऊदला भेटल्याचा दावा केला होता. त्यांच्या प्रवासाचा संपूर्ण तपशील आंबेडकर यांनी माध्यमासमोर मांडला होता.