मुंबई : गर्दीच्या व्यवस्थापनासाठी मध्य रेल्वेच्या सात स्थानकांची पुनर्रचना सुरू आहे. दादर, कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह ७ स्थानकांच्या रचनेत बदल सुरू आहे. स्थानकांवरील खाद्यपदार्थांची दुकानं फलाटांच्या दोन्ही टोकांजवळ नव्याने उभारण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे पूर्ण फलाट गर्दीच्या व्यवस्थापनासाठी उपलब्ध होणार आहे.
दादर, कुर्ला, ठाणे, घाटकोपर, वडाळा रोड या स्थानकांवरील २१ खाद्यपदार्थांच्या दुकानांची पुनर्रचना झाली आहे. डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवरील नऊ खाद्यपदार्थांच्या दुकानांची पुनर्रचना लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या सुरू असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांना त्यांची पाच वर्षे इतकी मुदत संपल्यावर मुदतवाढ मिळणार नाही. तसेच पुढील काळात गरज लक्षात घेऊन नवीन दुकानांबाबत निविदा काढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
प्रत्येक खाद्यपदार्थाचे दुकान सुमारे ३० ते ४० चौरसफूट जागेत होते. फलाटांच्या मधल्या भागातील दुकानांची पुनर्रचना केल्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे.