Sunday, March 08, 2026 12:22:55 PM

Russian Oil Imports : : रशियन तेलावरून अमेरिका-रशिया आमनेसामने! ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची मात्र वेगळीच भूमिका

रशियन तेलाची खरेदी बंद केल्याच्या अमेरिकेच्या दाव्यावर भारताने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही किंवा तो फेटाळलेलाही नाही. आता रशियाने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

russian oil imports    रशियन तेलावरून अमेरिका-रशिया आमनेसामने ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची मात्र वेगळीच भूमिका

Russian Oil Imports : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी भारताने रशियन कच्च्या तेलाची आयात थांबवल्याचा दावा केल्यानंतर जागतिक स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. मात्र, रशियाने अमेरिकेचा हा दावा फेटाळून लावत भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झाल्याचे संकेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरून भारत, रशिया आणि अमेरिका या तिन्ही देशांमध्ये राजनैतिक आणि आर्थिक चढाओढ पाहायला मिळत आहे.

रशियाकडून अमेरिकेचा दावा फेटाळला
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी बुधवारी स्पष्ट केले की, भारताने रशियन हायड्रोकार्बन्सच्या खरेदीबाबत आपली भूमिका बदलली असल्यावर विश्वास ठेवण्यासाठी कोणतेही कारण नाही. झाखारोव्हा म्हणाल्या की, "स्वतंत्र देशांनी काय करावे हे त्यांचे त्यांना स्वतःला सांगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हिरावून घेतला आहे, यात नवीन काहीच नाही." रशियाच्या मते, भारत आणि रशियामधील ऊर्जा व्यापार दोन्ही देशांसाठी फायदेशीर असून यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात स्थिरता राहते.

ट्रम्प यांचा दावा आणि 'टॅरिफ'ची रणनीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संवादानंतर अमेरिकेने भारतीय मालावरील दंडात्मक आयात शुल्क (टॅरिफ) 50 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. हे शुल्क कमी करताना ट्रम्प यांनी दावा केला होता की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचे मान्य केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनीही म्युनिक सुरक्षा परिषदेत सांगितले की, भारताने रशियन तेल खरेदी न करण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाच्या बदल्यात अमेरिकेने गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये लादलेले 25 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द केले आहे.

हेही वाचा - Hammer Missile : भारत-फ्रान्समध्ये संरक्षण करार; आता देशातच बनणार 'हॅमर' क्षेपणास्त्र; BEL आणि Safran ची मोठी भागीदारी

भारताची सावध भूमिका आणि 'राष्ट्रीय हित'
अमेरिकेच्या या मोठ्या दाव्यावर भारताने अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही किंवा तो फेटाळलेलाही नाही. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले आहे की, भारताचा ऊर्जा खरेदीचा निर्णय केवळ 'राष्ट्रीय हित' आणि ग्राहकांच्या गरजांवर आधारित असेल. भारत कोणत्याही एका देशावर अवलंबून राहण्याऐवजी आपले ऊर्जा स्रोत वैविध्यपूर्ण (Diversify) करण्यावर भर देत आहे. भारताने अमेरिकेला ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे आश्वासन दिले असले, तरी रशियासोबतचे दीर्घकालीन व्यापारी संबंध पूर्णपणे तोडलेले नाहीत.

आकडेवारीतील बदल आणि भविष्यातील कल
जानेवारी 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या आयातीत 40.48 टक्क्यांची घट झाली आहे. जानेवारी 2025 मध्ये ही आयात 4.81 अब्ज डॉलर्स होती, ती आता 2.86 अब्ज डॉलर्सवर आली आहे. विशेषतः रिलायन्ससारख्या खाजगी रिफायनरीजनी रशियन तेल खरेदी कमी केली असून, आता भारत व्हेनेझुएला आणि अमेरिकेकडून कच्चे तेल घेण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत, रशियाला भारताची भूमिका बदलली नसल्याचा विश्वास असला तरी, व्यावहारिक पातळीवर भारत आपले तेल आयात समीकरण बदलताना दिसत आहे.

हेही वाचा - Google AIIMS Partnership : गुगलची एम्ससोबत ऐतिहासिक भागीदारी; सुंदर पिचाईंनी स्पष्ट केली गुगलची आगामी रणनीती


सम्बन्धित सामग्री