पुणे : सदाभाऊ खोत यांचा गुरुवार ७ नोव्हेंबरचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यात शरद पवार समर्थक आंदोलन करणार होते. या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांची पुण्यातील नियोजीत पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. वाद टाळण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत ?
आता शरद पवार म्हणतात की त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. शरद पवारांना काय त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे ? असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले. या वक्तव्याचा शरद पवारांच्या समर्थकांनी तसेच अजित पवारांनी जाहीर निषेध केला. प्रकरण चिघळत असल्याची जाणीव होताच सदाभाऊ खोत यांनी माफी मागितली. कोणाच्याही व्यंगाविषयी किंवा आजारपणाविषयी चेष्टेच्या स्वरुपात बोलणे योग्य नाही. पण भाषण करतेवेळी गावगड्याच्या शैलीत बोलत गेलो. बोलत असताना नकळत कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो; असे सदाभाऊ खोत म्हणाले.
'फडणवीसांनी खोतांच्या कानाखाली मारली पाहिजे होती'
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर बोलताना उद्धव ठाकरे समर्थक राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांच्या कानाखाली मारायला हवी होती; असे संजय राऊत म्हणाले.