Tuesday, February 17, 2026 08:57:11 AM

Sadhvi Prem Baisa Death : साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? 'त्या' दोन इंजेक्शनबाबत धक्कादायक खुलासा

लोकप्रिय कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा काही दिवसांपूर्वीच संशयास्पद रीतीने मृत्यू झाला. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला आहे.

sadhvi prem baisa death  साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार त्या दोन इंजेक्शनबाबत धक्कादायक खुलासा

Sadhvi Prem Baisa Mysterious Death : जोधपूर येथील आरती नगरमधील 'साधना कुटीर' आश्रमात राहणाऱ्या लोकप्रिय कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा काही दिवसांपूर्वीच संशयास्पद रीतीने मृत्यू झाला. या प्रकाराने राजस्थानासह संपूर्ण देश हादरला आहे. केवळ 25 वर्षांच्या या तरुण साध्वीचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. या घटनेमागे एखादे मोठे गुन्हेगारी षडयंत्र तर नाही ना, या दिशेने आता पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. या प्रकरणातील धक्कादायक वळण म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर झालेली 'ती' पोस्ट. या पोस्टमध्ये त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. ही पोस्ट त्यांनी स्वतः जगाचा निरोप घेण्यापूर्वी पोस्ट केली होती की त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या कोणी केली, यावर तपास सुरू आहे.

'इंजेक्शन' आणि मृत्यूचे रहस्य
जोधपूर पोलीस आयुक्त ओमप्रकाश यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त (पश्चिम) छवी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली 11 सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. तपासादरम्यान समोर आले की, 28 जानेवारी 2026 रोजी साध्वींची तब्येत बिघडली तेव्हा एका डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एका कंपाउंडरला बोलावण्यात आले होते. या कंपाउंडरने साध्वींना दोन इंजेक्शन टोचली, ज्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या कंपाउंडरला ताब्यात घेतले असून, त्याने नेमकी कोणती इंजेक्शन दिली आणि त्यामागे कुणाचा आदेश होता, याचा तपास केला जात आहे.

मृत्यूनंतरची 'इन्स्टाग्राम' पोस्ट आणि ब्लॅकमेलिंगचा जुना वाद
साध्वींच्या मृत्यूनंतर सुमारे 4 तासांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली, जी एखाद्या 'सुसाईड नोट'सारखी वाटत आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षाचा उल्लेख करत न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. जुलै 2025 मध्ये त्यांचा एक व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आला होता, ज्याद्वारे त्यांना खंडणी मागून ब्लॅकमेल देखील केले जात होते, असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी आधीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या जुन्या वादाचा आणि त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूचा काही संबंध आहे का, हे शोधण्याचे मोठे आव्हान आता SIT समोर आहे.

हेही वाचा - Rohit Shetty House Firing : रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन?; पुण्यातून चौघे ताब्यात

वादग्रस्त व्हिडिओचे काय प्रकरण होते?
हा व्हिडिओ 2025 मधील असल्याचे सांगण्यात येत होते. या व्हिडिओमध्ये साध्वी प्रेम बाईसा यांचे एका साधूसोबतचे अश्लील चित्रण होते. काही लोकांनी तर व्हिडिओतील साधू म्हणजे त्यांचे वडील वीरमनाथ हेच असल्याचा दावा केला होता. तर, साध्वींनी हा व्हिडिओ खरा नसून तो चुकीच्या पद्धतीने आक्षेपार्ह वाटेल असा एडिट केला असल्याचे म्हटले होते. याच व्हिडिओसाठी त्यांना खंडणी मागितली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

प्रत्यक्षदर्शींचा खुलासा आणि SIT चा तपास
काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इंजेक्शन दिल्यानंतर साध्वींच्या नखांचा रंग हिरवा पडला होता आणि त्या वेदनेने किंचाळल्या होत्या. SIT ने आता पाल रोडवरील खासगी रुग्णालयाचे CCTV फुटेज ताब्यात घेतले असून, त्यात साध्वींचे वडील वीरमनाथ त्यांना रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. पोलिसांनी कंपाउंडरकडील वैद्यकीय साहित्य जप्त केले असून फॉरेन्सिक टीमद्वारे त्याची तपासणी केली जात आहे. मेडिकल बोर्डाकडून करण्यात आलेल्या शवविच्छेदनाचा (Post-mortem) प्राथमिक अहवाल 'राखीव' (Reserved) ठेवण्यात आला असून, व्हिसेरा तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

हेही वाचा - Pune Crime : कोयता गँगमध्ये आता महिलेची एन्ट्री; त्या रस्त्यावर मध्यरात्री नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

              

सम्बन्धित सामग्री