Saturday, February 08, 2025 06:58:55 PM

Saif Ali Khan Attacked News
सैफ अली खानावर घरात घुसून चाकूने हल्ला

डोक्यावर, गळ्यावर आणि पाठीवर गंभीर जखमा; शस्त्रक्रिया सुरू, हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घुसला होता

सैफ अली खानावर घरात घुसून चाकूने हल्ला 

मुंबई : बुधवारी रात्री अडीचच्या सुमारास बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर खार, मुंबई येथील त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर जखमा झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

हल्ला कसा झाला?
मुंबई पोलिसांचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, सैफ अली खान खार येथील फॉर्च्यून हाइट्स या इमारतीत राहतो. बुधवारी रात्री उशिरा एक व्यक्ती चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसला. त्या व्यक्तीने सैफच्या मोलकरणीशी वाद घातला. सैफने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला. या घटनेत सैफ गंभीर जखमी झाला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

पत्नी करिना कपूर कुठे होती?
हल्ल्याच्या वेळी सैफच्या कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते, याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, करिश्मा कपूरने ९ तासांपूर्वी तिच्या इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात ती करिना कपूर, रिया कपूर आणि सोनम कपूरसोबत पार्टी करताना दिसत होती. तिघींनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतल्याचे त्यांच्या पोस्टमधून दिसते. करिनाने देखील करिश्माची ही पोस्ट तिच्या अकाउंटवर रिशेअर केली होती. तथापि, सैफवर हल्ला झाला तेव्हा करिना घरी होती की तिच्या मैत्रिणींसोबत होती, याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

चाहत्यांची आणि सेलिब्रिटींची प्रतिक्रिया
या धक्कादायक घटनेनंतर सैफ अली खानचे चाहते आणि सेलिब्रिटींसह अनेकांना धक्का बसला आहे. कपूर आणि पतौडी कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सैफच्या लवकर बरे होण्यासाठी चाहते सोशल मीडियावर प्रार्थना करत आहेत. सैफच्या कुटुंबासोबत ते या कठीण काळात उभे असल्याचे युझर्सनी म्हटले आहे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 

कामाच्या बाबतीत सैफ अली खान सध्या त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. त्याचा शेवटचा चित्रपट ‘देवरा’ नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सैफसोबत ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर झळकले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. चित्रपटांव्यतिरिक्त, सैफ त्याच्या कुटुंबासोबतच्या नात्यामुळे कायम चर्चेत राहतो. करिना आणि मुलांसोबत त्यांनी यंदा स्वित्झर्लंडमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे केले होते.

👉👉 हे देखील वाचा : थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात ‘कोलाहल’


सम्बन्धित सामग्री