Monday, March 09, 2026 02:47:30 AM

Samruddhi Mahamarg : ठाण्यापासून समृद्धी महामार्ग आता अवघ्या काही मिनिटांवर; मात्र खिशाला बसणार टोलचा 'झटका'

भिवंडी परिसरातील गोदामांमुळे होणारी अवजड वाहतूक आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुमारे 6,742 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा मार्ग सहा पदरी असेल.

samruddhi mahamarg  ठाण्यापासून समृद्धी महामार्ग आता अवघ्या काही मिनिटांवर मात्र खिशाला बसणार टोलचा झटका

Samruddhi Mahamarg Toll : नागपूर ते मुंबई दरम्यानचा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला असला, तरी ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर पोहोचताना प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ठाणे (साकेत) ते आमणे दरम्यान एक नवीन उन्नत मार्ग (Elevated Road) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्ग गाठणे आता अवघ्या काही मिनिटांचे काम होणार असले, तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र टोलचा 'झटका' बसणार आहे.

प्रकल्पाचे स्वरूप आणि खर्च
भिवंडी परिसरातील गोदामांमुळे होणारी अवजड वाहतूक आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुमारे 6,742 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा मार्ग सहा पदरी असेल. हा उन्नत मार्ग ठाण्यातील साकेत ते राजनौली जंक्शनपर्यंत असेल आणि पुढे सोनाळे गावापासून वळण घेऊन करवली आणि आमणे गावाजवळ थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. यामुळे समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना ठाण्यात थेट प्रवेश मिळेल.

हेही वाचा - Mumbai Record Breaking AQI: मुंबईचा 'गॅस चेंबर' होतोय का? मागील सात वर्षांतील प्रदूषणाचे सर्व रेकॉर्ड मोडले; 'हा' आकडा वाचून तुमची धडकी भरेल

टोलचा नवा 'बोजा'
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागतील. एमएमआरडीएने या उन्नत मार्गावर 100 रुपये टोल आकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. विशेष म्हणजे, या टोलच्या रकमेत दरवर्षी 5 टक्के वाढ सुचवण्यात आली आहे. प्रकल्पाचा अवाढव्य खर्च, जमिनीचे संपादन आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी टोलचा पर्याय निवडण्यात आल्याचे समजते. हा टोल समृद्धी महामार्गाच्या मूळ टोलपेक्षा वेगळा असण्याची शक्यता आहे.

मोठ्या वाहतूक कोंडीतून सुटका
सध्या समृद्धी महामार्गाचा प्रवास आमणे येथे संपतो, तिथून ठाण्यापर्यंतचे 30 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांनी या साकेत-आमणे थेट मार्गाला मंजुरी दिली आहे. यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि डोंबिवली या शहरांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, नागपूर ते मुंबई हा प्रवास खऱ्या अर्थाने वेगवान आणि विनाअडथळा होणार आहे.

हेही वाचा - Mumbai AC Local: हार्बर लाईनवर महिन्याभरापासून वेळापत्रक कोलमडले, एसी लोकलमुळे प्रवाशांचा पारा चढला


सम्बन्धित सामग्री